मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राम कोणाला पावणार?

मुंबई विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत सरासरी ४० टक्के मतदान झाल्याचा अंदाज असून राम नवमी असल्यामुळे भाजपाचे सर्व पदाधिकारी रामनवमीच्या उत्सवात रमले होते. तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निवडणुकीसाठी सकाळपासूनच रस्त्यावर उतरुन कामाला लागले होते. त्यामुळे या निवडणुकीत 'राम कुणाला पावणार?' असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेने कसली होती कंबर

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच काँग्रेस विद्यार्थी संघटनांमध्ये प्रमुख निवडणूक आहे. परंतु, मागील सिनेट निवडणुकीत युवासेनेचे ८ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस वगळली, तर सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपाप्रणित अभाविप आणि शिवसेनेच्या युवा सेनेमध्ये प्रमुख लढाई होती. मात्र, ही निवडणूक युवा सेनेने प्रतिष्ठेची बनवून सर्व शाखाप्रमुख, नगरसेवक यांच्यावर जबाबदारी टाकली. रविवारी २५ मार्चपर्यंत 'कोणत्याही पदाधिकाऱ्याने मुंबई सोडू नये', अशा सूचना शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्या होत्या.

भाजपा राम नवमीच्या रॅलीमध्ये मग्न!

परंतु, सिनेट निवडणुकीच्या दिवशी राम नवमी असल्यामुळे भाजपाच्या सर्व कार्यालयांमार्फत रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे रस्त्यावर उतरून मतदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. या निवडणुकीत युवा सेनेने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीत शिवसेनेची ही ताकद दिसून येत होती.

६३ उमेदवारांची लढत

या निवडणुकीत १० जागांसाठी विविध विद्यार्थी संघटनांचे ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रत्येकी दहा उमेदवारांचे पॅनेल निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळे खरी लढत ही युवा सेना आणि अभाविपमध्ये आहे. निवडणुकीसाठी एकूण ६२ हजार ५५९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये युवा सेनेकडून अधिक मतदार नोंदणी झाली आहे.

सरासरी ४० टक्के मतदानाचा अंदाज

निवडणुकीचे मतदान संपले त्यावेळी सरासरी ३८ ते ४० टक्के मतदान झाल्याचा अंदाज होता. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र, आपल्याला या निवडणुकीबाबत तेवढ्या सूचना नव्हत्या. त्यामुळे आम्ही राम नवमीच्या रॅलीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे यापूर्वी ८ सदस्य निवडून आणणाऱ्या युवा सेनेला आता आपले संपूर्ण पॅनेल निवडून आणून सिनेट बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राम नवमी उत्साहात साजरी करणाऱ्या भाजपाला राम पावतो की हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असणाऱ्या शिवसेनेच्या युवासेनेला राम पावतो, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा

सिनेट निवडणूक: उमेदवारांना बोगस मतदानाची भीती

पुढील बातमी
इतर बातम्या