महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचं वसुलीचं टार्गेट १०० कोटी असेल तर, इतरांचं..?

महाराष्ट्रात विकास नाही तर, वसुली होत आहे. महाविकास आघाडी ही फक्त महालूट आघाडी नाहीय तर, महावसुली आघाडी पण आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचं वसुलीचं टार्गेट जर १०० कोटी असेल तर, इतरांचं किती असेल? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडीला टोला हाणला आहे.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रवीशंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला विकास नाही, तर वसुली सुरू आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात आधी सचिन वाझे नावाचे पोलीस अधिकारी अडकले, त्याची तार मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाशी जुळत असल्याने महाराष्ट्र सरकार हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यास तयार नाही. कारण यातून अनेकांची नावं बाहेर पडतील अशी महाविकास आघाडी सरकारला भीती वाटत आहे.

वसुली स्वत:साठी की पक्षासाठी?

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर मुंबईतून १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठरवल्याचा आरोप केला. तुम्ही विचार करा जर महाराष्ट्रातील केवळ मुंबईतून एक मंत्री १०० कोटी रुपयांची वसुली करत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती वसुली करत असेल. शिवाय इतर मंत्र्यांची वसुली किती असेल. त्यातही हा मंत्री स्वत:साठी वसुली करत होता, पक्षासाठी की सरकारसाठी वसुली करत होता, याचं अजून उत्तर मिळालेलं नाही.

हेही वाचा- “वाझेची पाठराखण का केली?, राज्यातील जनता विचारतेय”

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हे दाखवून दिलं की पोलीस खात्यात बदल्यांच्या नावाखालीसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. केवळ छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी देखील. 

बढतीच्या नावाखाली बाजूला

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी तपास केला तेव्हा यांत अनेक मोठे अधिकारी सामील असल्याचे आणि त्यांचे संबंध सत्तापक्षातील काही नेत्यांसोबत असल्याचे पुरावे त्यांना मिळाले. महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये वसुली होत असताना मुख्यमंत्री त्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा होती. परंतु दोषींविरोधात कारवाई करण्याऐवजी प्रामाणिक महिला अधिकाऱ्याला बढतीच्या नावाखाली बाजूला करण्यात आलं, असा आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला.

सीबीआय चौकशीची मागणी करणार

दरम्यान, पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा ६.३ जीबी इतका डेटा माझ्या हातात लागलेला आहे. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

हेही वाचा- अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात, मग ‘हे’ नेमके कोण?

    पुढील बातमी
    इतर बातम्या