Advertisement

अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात, मग ‘हे’ नेमके कोण?

१५ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत माहिती देणारे ‘हे’ नेमके कोण? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात, मग ‘हे’ नेमके कोण?
SHARES

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांची भेट घेतलीच नाही. कारण देशमुख हे होम क्वारंटाईनमध्ये होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. असं असेल तर १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत माहिती देणारे ‘हे’ नेमके कोण? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ रिट्विट करताना म्हटलं की, १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असं पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण? 

परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असं स्पष्टपणे दिसून येतं. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करत आहे?

भ्रष्टाचार आणि वसुलीबाज महाविकास आघाडी सरकारचा भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा- कणाहिन ठाकरे सरकार बरखास्त करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

देशमुख यांच्यावरील आरोप इतके गंभीर आहेत की याची न्यायालयाच्या देखरेखीतच चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि ते राजीनामा देत नाहीत, तोवर भाजपचं आंदोलन सुरूच राहील!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बैठक झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं. एवढंच नाही, तर देशमुख या काळात रुग्णालयात दाखल असल्याचं सांगताना पवार यांनी काही कागदपत्रेही दाखवली. कोरोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख नागपूरच्या रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख कुठे होते हे स्पष्ट झालं. आरोपांवर कोणती कारवाई करावी, कशी चौकशी करावी याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून त्यांनी निर्णय घ्यावा असं यावेळी शरद पवार म्हणाले. 

परमबीर सिंग यांच्या पत्राच्या माध्यमातून उभं करण्यात येत असलेलं चित्र म्हणजे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कट आहे. परमबीर सिंग यांचे आरोप निराधार, खोटे असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा