आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये- शरद पवार

भारिप-बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी 'आॅल इंडिया मजलीस ए मुसलमीन' अर्थात 'एमआयएम'सोबत नुकतीच आघाडीची घोषणा केली. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकवेळ काँग्रेसची युती करेन, परंतु राष्ट्रवादीशी नाही, असं वक्तव्य करताना राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, अशा शब्दांत त्यांच्यावर पलटवार केला आहे. नेहरू सेंटर येथील चित्र प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. 

पवार काय म्हणाले ?

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली होती. ही मदत अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच केली होती. तेव्हा राष्ट्रवादी धर्मनिपेक्ष नव्हता का?

काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी आंबेडकर यांच्या पक्षाने निलम गोऱ्हे यांना उभं केलं होतं. त्याचा फायदा भाजपातील प्रमोद महाजन यांना झाला होता. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक कोण धर्मनिरपेक्ष आणि कोण धर्मनिरपेक्ष नाही हे सांगतात.

काय म्हणाले होते आंबेडकर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धर्मनिरपेक्ष असले, तरी राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याचा दावा आंबेडकर यांनी केला होता. संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजे भाेसले उघडपणे भीमा-कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांची पाठराखण करतात. तेव्हा त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार?

२०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. पण राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे एकवेळेस काँग्रेससोबत आघाडी करू. परंतु राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला कदापी मंजूर नाही, असंही आंबेडकर म्हणाले होते.


हेही वाचा-

छत्रपतींच्या स्मारकाअाधी प्रतिकृती उभारणार; मुंबईकर, पर्यटकांची मतं घेणार

काँग्रेससोबत गेलो, तरी 'एमआयएम'ची साथ सोडणार नाही- प्रकाश आंबेडकर


पुढील बातमी
इतर बातम्या