Advertisement

काँग्रेससोबत गेलो, तरी 'एमआयएम'ची साथ सोडणार नाही- प्रकाश आंबेडकर

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेससोबत आघाडीचे संकेत देताना भाजपा, आरएसएस आणि राष्ट्रवादीवर टीका केली.

काँग्रेससोबत गेलो, तरी 'एमआयएम'ची साथ सोडणार नाही- प्रकाश आंबेडकर
SHARES

एकाबाजूला काँग्रेस भाजपाविरोधात समविचारी पक्षांची महाआघाडी उभारण्याचा प्रयत्न करत असताना भारिप-बहुजन महासंघाने 'आॅल इंडिया मजलीस ए मुसलमीन' अर्थात 'एमआयएम'सोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. या आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तरीही निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इतर पक्षांसोबत चर्चेची कवाडं खुली असतील, असं म्हणत भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला आघाडीचे संकेत दिले आहेत.

आंबेडकर यांनी 'वंचित बहुजन आघाडी' अंतर्गत 'एमआयएम' शी युती केली असून त्यात संभाजी ब्रिगेड सामील होईल, असा दावा करण्यात येत आहे. जुळून येत असलेल्या या जातीच्या समिकरणाचा धसका घेऊन काँग्रेसने आंबेडकर यांना चर्चेचं निमंत्रणही दिलं आहे. परंतु अद्याप या निमंत्रणाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आंबेडकर यांच्या भूमिकेकडे काँग्रेस नेत्यांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेससोबत आघाडीचे संकेत देताना भाजपा, आरएसएस आणि राष्ट्रवादीवर टीका केली.


काय म्हणाले आंबेडकर?

- निवडणुका जवळ येऊ लागल्याने भाजपा, आरएसएसने राम मंदिरचा मुद्दा पुन्हा तापवण्यास सुरूवात केली आहे. पण या मुद्द्यावर आता त्यांना मतं मिळणार नाही. कारण राम मंदिर उभारण्यात वा कुठलं धार्मिक स्थळ पाडण्यात लोकांना आता रस राहिलेला नाही.

- आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना संविधानाची तत्त्वे नाही, तर गोळवलकर यांचे विचार मान्य आहेत. त्यामुळेच ते गोळवलकर यांच्या we or our nationhood defined पुस्तकात लिहिलेले विचार समाजात पसरवत आहेत.

- या पुस्तकात हिंदू हा राष्ट्रीय धर्म असून इतर धर्मांनी दुय्यम भूमिका स्वीकारावी. इतर धर्माच्या नागरिकांना किती दिवस या देशात ठेवावं याचा निर्णय आता हिंदूंनी घ्यावा, अशी भाषा आहे. हे विचार एकसंध समाजासाठी धोकादायक आहेत.- शिवसेनेने आतापर्यंत वंचित बहुजनांचा केवळ वापर केला. आम्ही 'एमआयएम'सोबत युती केल्याचं ऐकून सर्वात जास्त चटका शिवसेनेला बसला आहे. त्यामुळेच गेल्या ४० वर्षांत माझ्यावर जेवढे अग्रलेख लिहिण्यात आले नाहीत, तेवढे टीका करणारे अग्रलेख मागच्या १५ दिवसांत लिहिण्यात आले आहेत.

- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. त्यांच्याच पक्षातील आमदार उदयनराजे भाेसले उघडपणे भीमा-कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांची पाठराखण करतात. तेव्हा त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार?

- २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. पण राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे एकवेळेस काँग्रेससोबत आघाडी करू. परंतु राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला कदापी मंजूर नाही. काँग्रेस नेते फोन करण्यापलिकडे अजून गेलेले नाहीत. आम्ही काँग्रेससोबत गेलो, तरी एमएआयएमशी युती तोडणार नाही. निवडणूक अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यासाठी चर्चा करू असं आंबेडकर म्हणाले.हेही वाचा-

नालासोपारा प्रकरण : तपास संथगतीने करण्याचा मुख्यमंत्र्याचा अादेश?

'वर्गाबाहेचे विद्यार्थी', राज ठाकरेंनी मोदी-शहांना व्यंगचित्रातून फटकारलेRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement