येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून कुठलेही मतभेद नाहीत. असल्यास वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन जागा वाटपाची समस्या सोडवली जाईल, त्यामुळे दोन्ही पक्ष यापुढे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना ट्विटरवरून दिली.
कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या ट्विटमध्ये पवार यांनी लिहिलं आहे की,''आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होईल. शिवाय मित्रपक्षांनाही सोबत घेतलं जाईल. जागावाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. असल्यास तो दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून सोडवतील.''
पवार यांनी महाआघाडीबद्दल देखील ट्विट केलं आहे. यांत ते म्हणात की, ''सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने वाटाघाटीही सुरू आहेत. महागठबंधनानंतर जागावाटप करताना ज्या राज्यात ज्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्याला अधिक जागा दिल्या जातील.''
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात सुरू असलेली चर्चेची फेरी आता शेवटच्या टप्प्यावर आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांवर यशस्वी बोलणी झाली असून उरलेल्या जागांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी रविवारी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा-
चलो पंढरपूर...सोमवारच्या सभेसाठी सेनेकडून जय्यत तयारी
चंद्रशेखर आझादांच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली, सभा घेण्यावर भीम आर्मी ठाम