'बकासूर रथ' देईल 'गरीब रथाला' उत्तर- पवार

लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि कोट्यवधी रुपये खर्च करुन जनतेला फसवायचं अशा फसवणुकीच्या गर्तेत अडकलेल्या जनतेला वाचवायचं असेल, तर सर्वांची सामुहिक शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तरच राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी 'मुंबईतील हल्लाबोल' सभेत केलं. सरकारने तयार केलेल्या गरीबरथाला उत्तर देण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण मुंबईत सरकारचा बकासूर रथ फिरवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

रोजगाराचं साधन कमी

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी आझाद मैदानावर भव्य जाहीर सभा झाली. यावेळी शरद पवार बोलत होते. महाराष्ट्रात आणि देशात नाराजीचं वातावरण आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. संसाराला लागणारं साहित्य महाग झालं आहे. रोजगाराचं साधन कमी झालं आहे. नवीन रोजगार मिळेनासा झाला आहे, असं पवार म्हणाले.

आमची सुटका करा

दुर्बल, दलित, आदिवासी, ओबीसी आदींसह इतर घटकांवर अन्याय होत आहेत. स्त्रीयांची तर प्रतिष्ठाही राखली जात नाही. त्यामुळे आम्हाला अच्छे दिन नको, तर आमचे जुने दिवस परत देऊन आमची सुटका करा. पण हे सरकार तसंही करणार नाही. त्यामुळे हे काम आपल्यालाच खांदयावर घ्यायचे आहे, असा सल्लाही पवार यांनी दिला.

या ह्ल्लाबोल आंदोलनाचे आयोजक मुंबई अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले, एकीकडे रोजगार बंद करण्याचं काम केलं जात आहे आणि दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या आडून गुजरातला मदत करण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे. तीन वर्षात या सरकारने फक्त घोषणाच केल्या आहेत. विकासाचा एकही प्रश्न सोडवला नाही, असा आरोपही अहिर यांनी केला.


हेही वाचा-

महाराष्ट्रातली 'महामुलाखत'! 'मुंबई लाइव्ह'वर

नवी पवारनिती! शेतकऱ्यांना मिळावं आरक्षण!!

कुणी वरून जरी आलं, तरी मुंबई महाराष्ट्रवेगळी करू शकत नाही- पवार


पुढील बातमी
इतर बातम्या