राज्यातील लसीकरणासाठी राष्ट्रवादीची २ कोटींची मदत

लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण २ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली. या निधीत राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारांनीही आपलं एक महिन्याचं वेतन देऊ केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातत्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती या परिस्थितीचं रोज अवलोकन ते करत होते. 

त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवार यांनी सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचं वेतन मदत निधी म्हणून देण्याचे निर्देश पक्षाला दिले.

हेही वाचा- तर, १ मे रोजी तरूणांना लस मिळू शकेल, राजेश टोपे यांचे संकेत

नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या (maharashtra) तिजोरीवर पडलेला ताण ध्यानात घेऊन रुग्णालयातून घरी परतल्यावर शरद पवार यांनी पक्षसहकाऱ्यांना तातडीने मदतनिधीसंबंधीच्या सूचना दिल्या. त्यानुसार महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसंच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात आला.

सोबतच विधानसभा आणि विधान परिषद सदस्य आणि तसंच राज्यातील सर्व खासदारांचं एक महिन्याचं वेतन मिळून आणखी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली.

ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलं.

(ncp donates 2 crore rupees to cm relief fund for covid 19 vaccination in maharashtra)

हेही वाचा- जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता? 

पुढील बातमी
इतर बातम्या