अर्थसंकल्प फुटीची सायबर क्राइमकडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे ट्विटरवर टाकत राज्याचा अर्थसंकल्प फोडल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी अर्थसंकल्प फुटीची सायबर क्राइमकडून चौकशी करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प फोडल्याच्या मुद्द्यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. 

ट्विटरवर बजेट फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, प्रसिद्धीसाठी हापापलेले मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांचा धिक्कार असो, फुटलेल्या बजेटची सायबर क्राइमकडून चौकशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी देखील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून केली. 

नेमकं काय झालं? 

मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे ग्राफिक्ससह टाकले जात होते. हा प्रकार धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनतर, विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी  हा सभागृहाचा अपमान असून सरकारने सभागृहाची त्वरीत माफी मागावी, अशी मागणी केली. 

डिजिटल मीडिया समजून घ्या

त्यावर खुलासा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, अर्थसंकल्प फुटलेला नाही. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अर्थसंकल्पाचे ताजे अपडेट्स देत होतो. अर्थमंत्र्यांचं भाषण आणि या पोस्टमध्ये २ ते ३ मिनिटांचं अंतर राखण्यात आलं. एकही पोस्ट आधी शेअर करण्यात आली नाही.  यावरून विरोधकांचा गैरसमज झाल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांनी आमच्याप्रमाणे नवीन डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करावं, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

 


हेही वाचा-

अर्थसंकल्प फुटल्याचा विरोधकांचा गैरसमज- मुख्यमंत्री

विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाला उच्च न्यायालयात आव्हान


पुढील बातमी
इतर बातम्या