अजित पवारांशी कोणताही संबंध नाही- धनंजय मुंडे

अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. तसंच, असं असाताना धनंजय मुंडे यांनी अजित पवारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवारांशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

वैयक्तिक निर्णय

'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. त्यावेळी अजित पवारही आमच्यासोबत होते. आता ते आमच्यासोबत नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अजित पवारांवर माझं प्रेम आहे ही गोष्ट वेगळी. मात्र, माझं अंतिम प्रेम आणि निष्ठा ही शरद पवार यांच्याशीच आहे. मी मरेपर्यंत शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल. अजित पवार हे राष्ट्रवादीत होते तोपर्यंत माझा त्यांच्याशी संबंध होता. आता माझा त्यांच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांच्याशी अद्यापपर्यंत माझा संपर्कही झालेला नाही’, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

संभ्रम निर्माण

'अजित पवारांनी ज्या दिवशी शपथ घेतली. त्या दिवशी मी बंगल्यावर नव्हतो. माझ्या बंगल्यातून फोन गेल्याचंही मला माहित नाही. माझ्या बंगल्यावर कुणाला बोलावलं गेलं हे सुद्धा मला माहित नाही. माझा बंगला हा सर्वांसाठी खुला असतो. त्या दिवशी मी राष्ट्रवादीच्या बैठकीला उशिरा पोहोचलो. त्यामुळे सर्व संभ्रम निर्माण झाला’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुन्हा पक्षात यावं

'मागील २ दिवसात त्यांच्याशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकवेळा संपर्क साधून त्यांना भेटून पक्षात येण्याची विनंती केली. त्यांनी राष्ट्रवादीत परत यावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळं त्यांनी पुन्हा पक्षात यावं हे मी त्यांना आताही आवाहन करत आहे. आम्ही सर्वच्या सर्व १६२ आमदारांनी संविधानाची शपथ घेऊन एकजूट राहण्याचं ठरवलं आहे. हेच चित्र विधानसभेत बहुमत सिद्ध करतानाच्या वेळेसही राहिल’, असंही त्यांनी म्हटलं.


हेही वाचा -

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात फैसला

... म्हणून हिंदुस्तानी भाऊच्या बायकोनं केली पोलिसांकडे तक्रार


पुढील बातमी
इतर बातम्या