मुंबईतील जुन्या वास्तूंच्या रिस्टोरेशनसाठी १० कोटींच्या निधीची मागणी

मुंबईतील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंच्या रिस्टोरेशन आणि संवर्धनासाठी ८ ते १० कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळावा अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

दादरचा वाळूचा भाग संपल्यात जमा!

राज्यातील पर्यटन या विषयावर आमदार जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये सविस्तर चर्चा केली. राज्याच्या पर्यटनासाठी सर्वंकष अशी पॉलिसी सरकारने आणण्याची गरज आहे. मुंबई सागरी किनाऱ्यावर पर्यटनाच्या दृष्टीने चांगला विकास झाला, असे दाखवले जात आहे. परंतु, आज दादर येथील समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबईला ११४ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून महाराष्ट्र सागरी मंडळाने या किनाऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी सिंगापूरच्या कंपनीला दिली आहे. दादर किनारपट्टीचा उल्लेख यासाठी करतोय की, ही किनारपट्टीची पाहणी स्वत: पायी फिरुन मी केली आहे, असं सांगतानाच दादरजवळचा वाळूचा प्रदेश संपल्यातच जमा झाल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.

'ऐतिहासिक वास्तूंचे रिस्टोरेशन व्हावे'

ऐतिहासिक वास्तूंचे रिस्टोरेशन कशा पद्धतीने करायचे? यासाठीचे काम पीडब्ल्यूडीकडे न देता ते काम ऐतिहासिक वास्तू तज्ज्ञांकडून करुन घ्यायला हवे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ब्रिटिशांनी मुंबईमध्ये इमारती उभारल्या त्या मुंबईच्या शान आहेत. ते स्वतः मुंबईचे पालकमंत्री असताना २००६-०७ मध्ये मुंबईतील जुन्या वास्तूंचे रिस्टोरेशन करुन घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे पर्यटनामध्ये सुधारणा करताना मास्टर प्लॅन तयार करा आणि त्यामध्ये सर्वांना विश्वासात घ्या, असा सल्ला जयंत पाटील यांनी सरकारला दिला.

मुंबईमध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पुतळयाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या स्मारकाला पहिल्यांदा पर्यटकांनी भेट दयावी, अशा पद्धतीचे काम व्हायला हवे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील पर्यटनाच्या मुद्दयाला हात घालताना पर्यटनाचा दर्जा कशा पद्धतीने वाढला पाहिजे? हेही सरकाच्या लक्षात आणून दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या