परळमधल्या ऐतिहासिक मैलाच्या दगडाचे जतन

Parel
परळमधल्या ऐतिहासिक मैलाच्या दगडाचे जतन
परळमधल्या ऐतिहासिक मैलाच्या दगडाचे जतन
See all
मुंबई  -  

परळ येथे रस्ता रुंदीकरणामध्ये सापडलेल्या मैलाच्या दगडाचे जतन मुंबई महापालिकेने केले असून या परिसराचे सुशोभिकरण महापालिका एफ-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पुढाकार घेऊन केले. या मैलाच्या दगडाभोवती माहिती देणारा शिलालेख बसवण्यात आला आहे.

परळ परिसरात दोनशे वर्ष जुन्या आणि सुशोभिकरणासह पुनर्स्थापित करण्यात आलेल्या मैलाच्या दगडाचे अनावरण मुंबई वारसा जतन समितीचे अध्यक्ष रमानाथ झा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, एफ-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे तसेच या उपक्रमास मदत करणा-या 'डी अॅण्ड जे फाऊंडेशन'चे रमेश जैन, वास्तूरचनाकार तपन मित्तल-देशपांडे, वारसा जतन कार्यकर्ता भारत गोठोस्कर यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.मुंबई महापालिका क्षेत्रातील पुरातन वास्तू आणि वारसाचे जतन व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांना हातभार लावण्यास 'मुंबई वारसा जतन समिती' सदैव कटीबद्ध आहे. हा वारसा जपण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होण्यासह स्वयंसेवी संस्थांनी देखील पुढे येणे गरजेचे आहे.

रमानाथ झा, अध्यक्ष, मुंबई वारसा जतन समिती


200 वर्षांपूर्वीचा दगड

एप्रिल महिन्यात परळमधील डॉ. एस. एस. राव मार्गावर अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासह रस्ता आणि पदपथ दुरुस्तीचेही काम महापालिकेद्वारे सुरू होते. या कार्यवाहीदरम्यान महापालिकेच्या पथकाला पदपथामध्ये अर्धवट गाडला गेलेला मैलाचा दगड सापडला. हा दगड साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी म्हणजेच इ. स. 1818 ते 1836 च्या दरम्यान बसवण्यात आला होता. त्याकाळी फोर्ट परिसरातील 'सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च' हा मुंबईचा प्रारंभिक बिंदू मानून त्यापासूनचे अंतर दर्शवण्यासाठी मुंबई शहरात मैलाचे दगड बसवण्यात आले होते. परळ परिसरातील जुन्या गव्हर्नर हाऊसजवळ असणाऱ्या या मैलाच्या दगडावर रोमन लिपीमध्ये 'पाच' (व्ही) हा आकडा लिहिलेला आहे. ज्याचा अर्थ सेंट थॉमस कॅथेड्रलपासून या मैलाच्या दगडाचे अंतर हे पाच मैल (सुमारे 8.05 किमी) एवढे आहे.


माहिती देणारा शिलालेख

परळ परिसरात महापालिकेच्या कामादरम्यान सापडलेल्या या ऐतिहासिक दगडाचे महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागाच्या पुढाकाराने या मैलाच्या दगडाची पुनर्स्थापना आणि आजुबाजूच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. हा दगड रात्री देखील ठळकपणे दिसावा यासाठी या दगडावर सौरउर्जेने प्रकाशमान होणारा दिवा बसवण्यात आला आहे. या पाचव्या मैलाच्या दगडाच्या बाजूला त्याची माहिती देणारा शिलालेखही बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी 'डी अॅण्ड जे फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.हेही वाचा -  

कशी पडली मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची नावं?


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.