Advertisement

मुंबईतील 'या' चार मैदानांवर लाल माती टाकण्यात येणार

शिवाजी पार्कनंतर मुंबईतील आणखी 4 मैदानांवर माती टाकली जाणार. स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

मुंबईतील 'या' चार मैदानांवर लाल माती टाकण्यात येणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उद्यान विभागाने माटुंगा, वडाळा आणि सायन परिसरातील किमान चार खेळाच्या मैदानांवर लाल माती टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व मैदानं एफ-नॉर्थ (F North) विभागाच्या हद्दीत येतात.

पावसाळा ओसरल्यानंतर मैदानांचा पृष्ठभाग खेळण्या योग्य राहिला नाही. त्यामुळे मुलांना आणि स्थानिकांना या मैदानांचा वापर करणे अवघड झाले आहे. त्यामुळे जमीन पुन्हा खेळ्या योग्य बनवण्यासाठी लाल माती टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मातीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

एफ-नॉर्थ विभागातील उद्यान विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, “या सर्व मैदानांवरील वरचा थर खूपच कडक झाला आहे. लाल माती जमिनीस मऊ बनवते, त्यामुळे आम्ही ती टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही माती फक्त त्या ठिकाणी टाकली जाईल, जिथे जमिन इतकी कडक झाली आहे की मुलांना खेळताना अडचण येते आणि इजा होण्याची शक्यता वाढते.”

रहिवाशांचा विरोध

शिवाजी पार्कच्या परिसरातील रहिवाशांनी महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. 2019 ते 2021 दरम्यान येथे तब्बल 80 ट्रक लाल माती टाकण्यात आली होती. पण या मातीमुळे स्थानिकांना त्रास होऊ लागला. परिसरातील नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास आणि इतर समस्या निर्माण झाल्या.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) तक्रार केल्यानंतर, मंडळाने बीएमसीला धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी लाल माती हटवण्याचे आदेश दिले होते.

तज्ज्ञांचे मत

भूविज्ञान सर्वेक्षण विभागात (Geological Survey of India) काम केलेले भूविज्ञानी संदीप ठाकूर म्हणाले, “लाल माती काळ्या मातीतून अधिक पाणी साठवून ठेवते, म्हणूनच ती मऊ राहते. मात्र, पाणी किंवा आर्द्रता नसताना ती माती सैल बनते. यामुळे धुळीची वादळं निर्माण होतात.”

दुसरे एक तज्ज्ञ, ज्यांनी नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली, त्यांनी mid-dayला सांगितले, “शिवाजी पार्क हा मोठा खुला परिसर असल्याने तेथील अडचणी वेगळ्या आहेत. वाऱ्यामुळे लाल मातीतून धूळ उडते. जर लाल मातीची रचना वाळूच्या मातीसोबत तुलना केली, तर वाळू पाण्याला सहज आत जाऊ देते आणि तीही मऊ असते. त्यामुळे खेळताना होणाऱ्या दुखापती कमी होऊ शकतात.”

स्थानिकांचा अनुभव

शिवाजी पार्कमध्ये अनेक वर्षे सराव करणारे वरिष्ठ खेळाडू आशिष सावरदेकर म्हणाले, “पावसानंतर लाल माती लगेच चिखलात बदलते. त्यामुळे चालणं तर दूरच, खेळणं आणि व्यायाम करणं अवघड होतं. अनेकदा पाय अडकतात, घसरतो आणि ही माती बूटांना चिकटून आसपासच्या पदपथांवर आणि जिमखान्यांमध्ये जाते, ज्यामुळे चिखल पसरतो.”

माटुंगामधील रहिवासी आणि माजी नगरसेविका नेहल शाह म्हणाल्या, “लाल माती मऊ असते आणि ती सहज पाणी शोषते. त्यामुळे या चार मैदानांवर लाल माती टाकत असताना आमची एकच मागणी आहे ती म्हणजे मैदानांना नियमितपणे पाणी देण्यासाठी पाईपलाइन घालावी. जेणेकरून कोरड्या हंगामात धूळ उडणार नाही. बीएमसीने अद्याप तसे केलेले नाही. जर रोज पाणी देण्याची योजना नसेल, तर लाल मातीमुळे प्रदूषण आणि धुळीची वादळं निर्माण होण्याचा धोका आहे.”

बीएमसीचे स्पष्टीकरण

उद्यान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “शिवाजी पार्कचा प्रश्न वेगळा आहे कारण तो खूप मोठा परिसर आहे. एफ-नॉर्थ विभागातील ही चार मैदानं फक्त सुमारे 2000 चौ.मी. इतकी आहेत. एवढ्या छोट्या जागांवर देखभाल सोपी असते, आणि जर धुळीची समस्या उद्भवली तर ती नियंत्रणात ठेवता येईल.”

लाल माती टाकण्यात येणाऱ्या चार मैदानांची ठिकाणे

  • नप्पू हॉलजवळ, तेलंग रोड, माटुंगा
  • सहकार नगर, वडाळा
  • अनंत नारायण दळवी मैदान, सायन बस डेपोसमोर
  • वसांजी पार्क, दस्तूरवाडी, दादर (पूर्व)



हेही वाचा

दादरमधील मच्छी विक्रेत्यांना मुलुंडला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव

पालिका मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा