
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस डेपो आणि क्रीडा संकुल या ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवून शेल्टरमध्ये ठेवावे. पण या आदेशानंतर पालिकेला एका समस्येचा सामना करावा लागत आहे.
महानगरपालिकेने म्हटले आहे की, सध्या शहरात एकही डॉग शेल्टर उपलब्ध नाही. त्यामुळे अशा सुविधा नव्याने उभाराव्या लागतील किंवा एखाद्या इमारतींचे रूपांतर करावे लागेल. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभाग स्तरावर सर्वेक्षण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे डॉग शेल्टर कुठे सुरू करता येतील याची पाहणी केली जाईल.
महापालिकेने स्पष्ट केले की सध्या फक्त प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control – ABC) केंद्रे कार्यरत आहेत, जी कुत्र्यांच्या नसबंदीकरिता तात्पुरत्या स्वरूपात वापरली जातात. अशी नऊ केंद्रे महालक्ष्मी, शिवडी, परळ, देवनार, मालाड आणि मुलुंड येथे आहेत. या केंद्रांमध्ये दीर्घकाळासाठी प्राण्यांना ठेवण्याइतकी पायाभूत सुविधा नाहीत.
सर्वेक्षणानुसार गेल्या दशकात मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या 21% ने घटली आहे. 2014 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 95,172 इतकी होती. ती 2024 मध्ये 90,757 पर्यंत घसरल्याची नोंद आहे.
19 महानगरपालिका विभागांपैकी सरासरी 31% घट नोंदवली गेली असली तरी काही भागांत उलट वाढ झाल्याचे दिसून आले. E विभाग (भायखळा), N विभाग (घाटकोपर), R दक्षिण विभाग (कांदिवली) आणि T विभाग (मुलुंड) येथे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. तर D विभाग (मालाबार हिल) येथे ती स्थिर राहिली. सर्वाधिक घट K पश्चिम (अंधेरी-जुहू, –70%), H पश्चिम (बांद्रा पश्चिम, –68 %) आणि H पूर्व (बांद्रा पूर्व, –59%) येथे नोंदली गेली. तर सर्वाधिक वाढ T विभाग (+37%) आणि E विभाग (+22%) येथे झाली आहे.
कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेमुळे एकूण संख्येत घट झाल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणानुसार सध्या 31% नर आणि 30% मादी कुत्र्यांची नसबंदी झाली आहे. 2014 मध्ये अनुक्रमे 19% आणि 46% कुत्र्यांची नसबंदी झाली आहे.
हेही वाचा
