परळला सापडला मैलाचा दगड

  Parel
  परळला सापडला मैलाचा दगड
  मुंबई  -  

  मुंबई महपालिकेच्या अनधिकृत बांधकामाच्या धडक कारवाईत परळ येथील केईएम हॉस्पिटलच्या मागील बाजूस एस. ए. राव मार्गावर ब्रिटिशकालीन मैलाचा दगड आढळून आला. मुंबईत अशा प्रकारचे 15 ठिकाणी मैलाचे दगड बसवण्यात आले असल्याचे पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

  देशातून दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीशांना हाकलून लावले तरी त्यांच्या आठवणी आजही दडून आहेत. मुंबईतही ब्रिटीशांनी बांधलेल्या सीएसटीसह महापालिका मुख्यालय, राजाबाई टॉवर्स, हायकोर्ट आदी इमारती आजही मुंबईकरांसह पर्यटकांना भुरळ पाडतात. एवढेच नव्हे तर ब्रिटीशांच्या काळातील अनेक वस्तू भूगर्भात दडलेल्या आहेत. यातील एक मैलाचा मोजमाप दर्शवणारा ब्रिटीशकालीन दगड शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सापडला. के.ई.एम जवळील एस.ए.राव मार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना हा दगड सापडला असल्याचे एफदक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

  पूर्वी रस्त्यांवरील अंतर हे मैलावर मोजले जात असे. मात्र, आता ते किलोमीटरमध्ये मोजले जाते. परंतु किलोमीटरमध्ये दर्शवणारे दगड कुठेही लावण्यात आलेले नाहीत. ब्रिटीशांच्या काळात मुंबईतील रस्त्यावर सन 1816 ते 1837 च्या काळात असे मैलांचे दगड लावले होते. परंतु मुंबईचा विकास आणि नगररचना यामध्ये ब्रिटीशांनी रोवलेले मैलाचे दगड हे काढले गेले तर काही ठिकाणी जमिनीखाली गाडले गेले.

  शहरात असे 32 मैलांचे दगड

  मुंबईत 1800 च्या काळात थॉमस चर्च हॉर्निमल सर्कल येथून शहरातील रस्त्यावरील अंतर मोजले जात असे. त्यामुळे पहिला मैलाचा दगड थॉमस चर्च येथे बसवण्यात आला होता. त्यानंतर काळबादेवी येथे एक मैलाचा दगड बसवण्यात आला. तर नळबाजार इब्राहिम रहिमतुल्ला रोड येथे 2, माउंट रोड बँक ऑफ इंडिया जवळ 3, ताडदेव रोड जावजी दादाजी मार्ग येथे 3, केईएम हॉस्पीटल येथे 5 , एन. एम. जोशी 5 , चित्रा सिनेमा 6 , लेडी जेमशेदजी रोड, शिवसेना भवन येथे 8 मैलाचे दगड बसवण्यात आले होते. यातील काही दगड आजही अस्तित्वात असल्याचे पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.