Advertisement

कशी पडली मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची नावं?


कशी पडली मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची नावं?
SHARES

रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफ लाईन. रोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली रेल्वे कशी सुरू झाली? पहिली रेल्वे कुठे धावली? रेल्वे स्टेशनची नावं कशी पडली? याबद्दलचा रंजक इतिहास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ब्रिटिशांना मुंबई ही पोर्तुगीजांकडून हुंड्यात मिळाली. सात बेटांवर वसलेली मुंबई ब्रिटिशांच्या हाती गेल्यावर मुंबईचा कायापालट झाला. 

भारतात दळवळण सोयीस्कर व्हावे, या हेतूनं ब्रिटिशांनी रेल्वेसेवा सुरू करण्याचा विचार केला. मात्र, त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यामागे हात होता जगन्नाथ शंकरशेठ यांचा. भारतीय रेल्वेचे जनक म्हणून शंकरशेठ यांना ओळखले जाते. भारतात जगन्नाथ शंकरशेठ आणि जमशेदजी जीजीभॉय यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. 

समुद्रात मातीचा भराव टाकून स्टेशन आणि रेल्वे रूळ उभारण्यात आले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १६ एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे धावली ती मुंबई ते ठाणे या मार्गावर. या पहिल्या रेल्वेनं मुंबई ते ठाणे ३५ किमीचा प्रवास ४५ मिनिटांत पूर्ण केला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे...


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

1888 साली व्हिक्टोरिया टर्मिनसच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं. ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या 50व्या वाढदिवसाप्रीत्यर्थ या इमारतीचं नाव बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी टर्मिनस उभारण्यासाठी समुद्रात मातीचा भराव टाकून सुमारे ८൦ एकर जागा संपादित करण्यात आली. 1878 साली या व्हिक्टोरिया टर्मिनसचं काम सुरू झालं होतं. हे टर्मिनस उभारण्यासाठी दहा वर्षे लागले. त्यासाठी १६ लाख ३५ हजार ५६२ रुपये इतका खर्च आला होता. 1996 मध्ये व्हिटी स्टेशनचं नामांतर छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले. पण नुकतंच स्टेशनचं पुन्हा नामांतर करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव करण्यात आलं.


भायखळा

ब्रिटिशांनी १८५७ साली भायखळा स्टेशन बांधलं. भायखळा ही जागा म्हणजे धान्याचे खळे अर्थाच गोदाम होते आणि त्याच्या मालकाचे नाव भाया होते. 'भाया'चे खळे म्हणजे भायखळे आणि त्याचा झाला भायखळा, असं बोललं जातं.


करी रोड

१८६५ ते १८७५ दरम्यान भारतात जीआयपी, बीबीसीआय अशा रेल्वे कंपन्यांच्या देखरेखीची जबाबदारी सी. करी यांच्यावर होती. या कंपन्यांच्या कामावर देखरेख करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्याला 'एजंट' अशी उपाधी होती. त्यांच्या नावावरून रोडला आणि स्टेशनला 'करी रोड' हे नाव देण्यात आलं. 



कॉटन ग्रीन

१८ व्या शतकात इंग्रजांच्या किल्ल्यात (आजचा फोर्ट भाग) असलेले सेंट थॉमस चर्च हिरवी झाडे असलेल्या भागात होते. जवळच्या बंदरामुळे आसपास कापसाचे ढीग साचलेले दिसायचे. म्हणून या भागाला 'कॉटन ग्रीन' हे नाव पडले.

१८४४ मध्ये इथला कपड्याचा व्यापर कुलाब्याला हलवला गेला आणि त्या भागाला नाव पडले 'न्यू कॉटन ग्रीन'. त्यानंतर शिवडी-माझगावमध्ये कापसाचा व्यापार हलवला गेला. या परिसरातच मोठी कॉटन एक्स्चेंज इमारत बांधण्यात आली. त्याच्या समोरच बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला 'कॉटन ग्रीन' नाव देण्यात आले. आता या स्टेशनचं नाव काळाचौकी होण्याची शक्यता आहे.


चर्चगेट

चर्चगेट हे सध्याच्या फ्लोरा फाऊंटन येथे होते. जवळच सेंट थॉमस कॅथड्रल नावाचे चर्च होते. या चर्चवरूनच स्थानकाला चर्चगेट हे नाव दिले गेले.


ग्रँट रोड

१८३५ ते १८३८ या दरम्यान सर रॉबर्ट ग्रँट हे मुंबईचे गव्हर्नर होते. ग्रँट रोडचा परिसर हा ओसाडच होता. त्यामुळे तिकडे रहदारीही नव्हती. 

अशा भागात रस्ता बांधून तो गिरगावला जोडण्याचं काम गव्हर्नर ग्रँट यांनी केलं. त्यामुळे ग्रँट रोड स्टेशनचे नाव सर रॉबर्ट ग्रँट यांच्या गौरवार्थ ठेवले गेले. आता ग्रँट रोडचे नाव गावदेवी होण्याची शक्यता आहे. 


चर्नी रोड

गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे स्थानकाला चर्नी रोड हे नाव देण्यात आले. 

१८४८ साली ब्रिटिशांनी मुंबईमधल्या कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणं सुरू केलं होतं. पैसे देण्याची ऐपत नसल्यानं गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी, सर जमशेटजी जीजीभॉय यांनी स्वत:चे २൦ हजार रुपये खर्चून ठाकूरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्याजवळील जमीन विकत घेतली. तिथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा देण्यात आली. या चरणींच्या जवळ असल्यानं १८६७ मध्ये बांधण्यात आलेल्या स्टेशनला चर्नी रोड हे नाव देण्यात आले. आता चर्नी रोड स्टेशनचं नाव बदलून गिरगाव स्टेशन होण्याची शक्यता आहे. 


परळ

या ठिकाणी पुष्कळ परळीची झाडं होती म्हणून या स्टेशनला परळ हे नाव देण्यात आलं.


दादर

दादरमधून जाणाऱ्या रेल्वे रूळांमुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी आणि पादचारी लोकांसाठी एक पूल आणि जिना बांधला गेला. जिन्याला दादर असे म्हटले जाते आणि त्यावरूनच स्टेशनचे नाव दादर असे ठेवण्यात आले. 

दादर हा शब्द १८३१ सालात छापलेल्या मोल्सवर्थ मराठी इंग्लिश शब्दकोषात सापडतो. त्यात या शब्दाचा इंग्रजी अर्थ 'ब्रीज' असा करण्यात आला आहे.


विले पार्ले

या परिसराला विले पावडे असे म्हटले जायचे. विले पावडे हे पोर्तुगीज नाव आहे. विले म्हणजे वसाहत आणि पावडे म्हणजे झोपडी. इथे कोळी लोकांच्या वसाहती होत्या.

या वसाहतींना 'विले पावडे' असे बोलले जायचे. लोकांनी केलेल्या शब्दांच्या अपभ्रंशामुळे (चुकीच्या उच्चारामुळे) त्याचे पुढे 'विले पार्ले' झाले.


घाटकोपर

घाटकोपर म्हणजे घाट. घाटाच्या वरती (घाट के उपर) वसलेलं गाव म्हणजे घाटकोपर. लोकांनी केलेल्या शब्दांच्या अपभ्रंशामुळे (चुकीच्या उच्चारामुळे) स्टेशनला 'घाटकोपर' हे नाव पडलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा