अस्तंगत झालेला मैलाचा दगड

Sion Koliwada
अस्तंगत झालेला मैलाचा दगड
अस्तंगत झालेला मैलाचा दगड
अस्तंगत झालेला मैलाचा दगड
अस्तंगत झालेला मैलाचा दगड
अस्तंगत झालेला मैलाचा दगड
See all
मुंबई  -  

गेल्या दोनशे वर्षांपासून एक ब्रिटिशकालीन मैलाचा दगड (माइलस्टोन) सायन कोळीवाडातील तामिळ संघ मार्गावरील पदपथावर अंग चोरून, कसाबसा स्वत: ला जपत, अस्तित्व टिकवून होता. खरं तर त्याचा काळ सरला होता. पण वेळ आली नव्हती. अखेर ती वेळ आली आणि गेल्या आठवड्यात कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेने एका क्षणार्धाथ या मैलाच्या दगडाचे दोन तुकडे केले. तेव्हापासून हा दगड अशाच तुटलेल्या अवस्थेत पडून आहे.
परळमध्येही आढळला अनमोल ठेवा

दोन महिन्यांपूर्वीच परळच्या थॉमस कॅथड्रल चर्चजवळील अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना असाच एक मैलाचा दगड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला आढळून आला होता. तेव्हा मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा हा अनमोल ठेवा जपण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होतेच, पण हेरिटेज कमिटी आणि आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने मुंबईतील अशा आणखी मैलांच्या दगडांचा शोध घेण्याची ग्वाही दिली होती. परंतु हा शोध सुरू होण्यापूर्वीच 'आठ' मैलाचे अंतर दर्शवणारा हा दगड दुभंगला.


महापालिका, हेरीटेज कमिटीचे दुर्लक्ष

पुरातन वास्तू अभ्यासक नितीन साळुंखे यांना सायन येथील अभ्यास दौऱ्यात हा दगड तुटलेल्या अवस्थेत दिसला. वरच्या भागात आठ आणि खाली सेंट थॉमस चर्च असे या दगडावर लिहिलेले आहे. साळुंखे यांनी आजूबाजूच्या रहिवाशांकडे चौकशी केल्यावर महापालिकेच्या कचरा वाहतूक डंपरने गाडी वळवताना या मैलाच्या दगडाला धडक दिल्याने दगड तुटल्याची माहिती दिली. परंतु एक आठवडा उलटूनही या ब्रिटिशकालीन मैलाच्या दगडाचे जतन करण्यासाठी महापालिका अधिकारी किंवा पुरातन वास्तू विभाग अधिकारी येथे फिरकलेही नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत महापालिका एफ/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त केशव उबाळे यांच्याशी चर्चा केली असता रस्त्याच्या कडेला पडून असलेला हा मैलाचा दगड जेसीबीच्या साहाय्याने काळजीपूर्वक उचलून काही दिवस बाजूच्या सोसायटीत वास्तूविशारदाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या मैलाच्या दगडाचे जतन करण्यात येईल, असे सांगितले.ब्रिटिशांनी का लावले मैलाचे दगड ?

दोन ठिकाणांमधील अंतर मोजण्यासाठी ब्रिटिशांनी कुलाबा ते शीव परिसरात एकूण 10 ते 15 मैलाचे दगड लावले होते. हे मैलांचे दगड 1816 ते 1837 च्या काळात लावण्यात आले होते. कालांतराने अंतर मोजण्यासाठी किलोमीटरचा वापर होऊ लागल्याने मैलाचे महत्त्व कमी झाले.


कुठे, कुठे लावले मैलाचे दगड ?

काळाघोडा येथील सेंट थॉमस कॅथॅड्रल चर्च हे सुरूवातीचे ठिकाण मानून येथे मैलाचा पहिल्या क्रमांकाचा दगड ब्रिटिशांनी लावला होता. तेथून पुढे प्रत्येक मैलाला सेंट थॉमस चर्चपासून 1 मैल, 2 मैल अशा स्वरूपाचे दगड ठिकठिकाणी लावण्यात आले. आतापर्यंत हे दगड माहीम कॉजवे, शीव किल्ला, गवालिया टँक आणि परळ येथे सापडले आहेत. त्यात शीव कोळीवाड्यातील या मैलाच्या दगडाची भर पडली आहे.


नवीन नगररचनेत जमिनीखाली गाडले

मुंबईचा विकास करताना नवीन नगररचनेत काही ठिकाणचे मैलाचे दगड काढण्यात आले, तर काही ठिकाणी ते तसेच राहिले वा जमिनीखाली गाडले गेले. या वास्तूंची देखभाल करण्याचे काम महापालिकेच्या देखभाल (मेंटनेस) विभागाचे आहे. मात्र महापालिकेलाच या एेतिहासिक वारशाचे महत्त्व न समजल्यानेच हे मैलाचे दगड कुठे रस्त्यांखाली, तर कुठे इमारतींखाली गाडले गेले आहे.


उरलेल्या खाणाखुणा -

सेंट थॉमस चर्च, काळाघोडा - Coordinates:18°55’54.78” N 72° 50’1.71”E.एक मैल - सेंट थॉमसपासून एक मैलाच्या अंतरावर असलेल्या इंडिया वाइन्स दुकानाच्या समोरील पदपथावर हा पहिला मैलाचा दगड लपलेला आहे.
तसेच एस. पी. जैन सेंटर ऑफ मॅनेजमेंट येथील पदपथावर एक मैलाचा दगड आढळतो.
Coordinates:18°56’39”N 72°49’46”E.

तीन मैल - भाटीया रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला तिसऱ्या मैलाचा हा दगड आहे. ऑगस्ट क्रांती मैदान आणि गवालिया टँक येथेही तीन मैलांचे आणखी दोन दगड आहेत.
Coordinates:18°57’54”N 72°48’46”E.चार मैल - ना. म. जोशी मार्ग, चिंचपोकळी येथे चौथ्या मैलाचा दगड.
Coordinates: 18°59’11.0”N 72°49’54.0”E

पाच मैल - महादेव गांगण मार्ग येथे पाचव्या मैलाचा दगड दिसतो.
Coordinates: 18°58′30.5″N 72°49′33.5″Eसहा मैल - दादरच्या चित्रा सिनेमागृहाचा विरुद्ध दिशेला सहाव्या मैलाचा दगड. Coordinates:19°0’47”N 72°50’40”E.सात मैल - कबुतरखाना, अँटोनिओ डी सिल्व्हा हायस्कूलजवळ सातव्या मैलाचा दगड.

Coordinates:19°1’11”N 72°50’22”E.आठ मैल - सायन किल्ल्याजवळ आठ मैलाचा दगड.
Coordinates:19°02’13.4”N 72°51’42.3”E.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.