Advertisement

शिवस्मारकाचं काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार- मुख्यमंत्री


शिवस्मारकाचं काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार- मुख्यमंत्री
SHARES

अरबी समुद्रात उभारण्यात येणारं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काम पुढील ३६ महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्मारकाचं काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला 'लेटर ऑफ एक्सेप्टन्स' देण्यात आलं. जागतिक किर्तीच्या या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कंपनीने हे काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


जलदगतीने मिळवले परवाने

गेल्या १५ वर्षांपासून छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. युती सरकार आल्यानंतर शिव स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला गती मिळाली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले. 

त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत केली. त्यानुसार गुरूवारी एल अँड टी कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आलं. जागतिक किर्तीच्या स्मारकाचं काम कंपनीने कमी कालावधीत केल्यास कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.


नव्या पिढीला प्रेरणा

नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी व मार्गदर्शन मिळावं, यासाठी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अरबी समुद्रात उभं राहणारं स्मारक हे जगातील अद्वितीय स्मारक असणार आहे. या स्मारकाचा अतिशय सुंदर आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मारकाचा गौरवपूर्ण उल्लेख पुढील काळात देशाच्या वैशिष्ट्यांमध्ये होईल.
- विनायक मेटे, अध्यक्ष, शिव स्मारक समिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा