वांद्रे ते वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्ग जोडल्याने वाहनचालकांचा प्रवास विनाअडथळा आणि वेगवान झाला आहे. या मार्गावरुन वरळी आणि मरिन ड्राइव्ह या दोन्ही दिशांना दररोज सरासरी प्रत्येकी 22 ते 25 हजार वाहने धावत आहेत.
याच वर्षी जानेवारीमध्ये ही संख्या 16 ते 17 हजार होती. 12 मार्च 2024 पासून सागरी मार्गातील आणखी टप्पे सुरू झाल्यानंतर वाहनचालक या मार्गाला पसंती देत आहेत.
मुंबई सागरी किनारा मार्गातील (mumbai coastal road) मरिन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकपर्यंत टप्प्याटप्यात मार्ग सुरू करण्यात आले आहेत. 10.58 किमीच्या या मार्गातील प्रियदर्शनी पार्क ते मरिन ड्राइव्हपर्यंत 2.07 किमी लांबीचा बोगदाही सेवेत आल्यामुळे प्रवासही सुसाट होत आहे.यातील वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक (worli) ते मरिन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी 12 मार्च 2024 रोजी वाहनचालकांसाठी खुली करण्यात आली. या मार्गावर प्रतितास 80 किमी वेगाने तर, बोगद्यातून प्रतितास 60 किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी आहे.
ठिकठिकाणी वेगमर्यादेचे फलकही लावण्यात आले आहेत. बोगद्यातून प्रवास करताना वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी दर 50 ते 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये दर तासाला सरासरी 500 ते 700 वाहने मरिन ड्राइव्ह आणि वरळी दिशेने जात होती. हीच संख्या आता 1,200 ते 1,300 एवढी झाली आहे.
मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंक हा मुंबई (mumbai) सागरी किनारा मार्ग वाहनचालकांसाठी सध्या सकाळी 7 ते रात्री 12 असा 17 तास खुला आहे. त्याला वाहनचालकांकडून पसंती मिळत असल्याने हा मार्ग 24 तास खुला ठेवण्याचे नियोजनही केले जात आहे.
हेही वाचा