ठाणे, पालघर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा मानला जाणारे कोकण कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. निवडणुकीआधी डावखरे यांच्यासारखा तरूण नेता भाजपाच्या गळाला लागल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून २०१२ मध्ये निवडून आले होते. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत आला होता. बुधवारी त्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून वडिल वसंत डावखरे यांच्यासोबत मी पक्षाची जडणघडण पाहिली आहे. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरु होत्या. या गटाने २०१६ मध्ये विधानपरिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या.
तरीही, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नाही. आताही याच गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्थरावर डावललं जात होतं. अखेर स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असं निरंजन डावखरे यांनी सांगितलं.
पक्षांतर्गत राजकारणामुळे निराश झालेले निरंजन डावखरे मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांच्या संपर्कात आले होते. दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग पालघर, ठाणे जिल्ह्यात आहे. तो भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. तसंच भाजपाला ठाणे पट्ट्यात एक तरुण चेहरा लाभणार असल्याने भाजपाला इथं बळकटी मिळणार हे निश्चित.
निरंजन डावखरे यांना आमदारकी देण्यासोबतच त्यांच्याकडे विद्यार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून राज्याचं नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. तरीही केवळ संधीसाधूपणामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. निरंजन डावखरे यांना या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी, बसेल असा इशाराही गर्जे यांनी दिला.
हेही वाचा-
मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
पालघरच्या आखाड्यात उद्धवचा सामना योगीशी