सरकारच्या चांगल्या कामाला 'दिलसे' पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. अमित यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं होतं.
मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलाचा-तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरूंगवासही भोगला, अशा पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम! सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. आरेच्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. आरेबाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचेही आभार, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया नोंदवली होती.
हेही वाचा - अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...
मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल. प्रगती नक्की व्हावी, पण निसर्गाचा बळी देऊन नाही. ‘आरे’तील कारशेड रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागतच, पण आता तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वनसंवर्धन व्हावं, अशी भूमिकाही अमित ठाकरे यांनी घेतली आहे.
त्यावर, आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला 'दिलसे' पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केवळ अहंकारापोटी घेतलेला हा निर्णय असून यामुळे सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे, असा दावा भाजप नेते करत आहेत.