मनसेला कल्याणची जागा?, महाआघाडीत समावेशाची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू होते. मात्र, मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसने विरोध केला होता. पण आता मनसेचा महाआघाडीत समावेश होण्याचं निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मनसेला राष्ट्रवादीकडून कल्याण लोकसभेची जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सोमवारपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधीचं आवाहन

लोकसभा निवडणुकीत युतीचा पराभव करण्यासाठी महाआघाडीने कंबर कसली आहे. महाआघाडीत इतर पक्षांना घेण्यात अद्याप यश आलेलं नाही. पण महाआघाडीत मनसेला घेण्यास राष्ट्रवादी आग्रही असताना काँग्रेसने मात्र सुरूवातीपासूनच विरोध केला होता. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईतील सभेत मोदी विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर मनसेचा महाआघाडीत समावेश होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. मनसे महाआघाडीत दाखल होण्याचं जवळजवळ निश्‍चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेस जागा सोडणार?

 मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढली आहे. दोघांमध्ये चर्चाही सुरू होती. स्वतःच्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. तर काँग्रेसनेही मनसेला एक जागा सोडावी, असा प्रयत्न  राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मनसेला विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांशी शरद पवार स्वतः बोलणार असल्याचं समजतं. कल्याण लोकसभेसाठी मनसेकडून राजू पाटील किंवा त्यांचे भाऊ रमेश पाटील हे उमेदवार असू शकतील. 


हेही वाचा - 

राहुल यांचं आश्वासन जुमलेबाजी नाही; संजय निरूपम यांचा दावा

राज शनिवारी कुणावर करणार 'सर्जिकल स्ट्राईक'?


पुढील बातमी
इतर बातम्या