दस्तुरखुद्द शरद पवार यांनी मनधरणी करूनही साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. उदयनराजे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भव्यदिव्य सोहळ्यात भाजपात प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने विरोधकांना धोबीपछाड दिल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात जणू खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गज नेते एकएक करत शिवसेना-भाजपात प्रक्षप्रवेश घेताना दिसत आहेत. मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ९ विद्यमान आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता खा. उदयनराजेंचा देखील समावेश होईल.
भाजपाचे अजून पूर्ण दरवाजे उघडले नाहीत, पूर्ण दरवाजे उघडल्यास काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीत शरद पवार यांच्याशिवाय दुसरं कुणीही उरणार नाही, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पवार यांना लगावला होता.
सोलापूर इथं झालेल्या भाजपाच्या दुसऱ्या मेगाभरतीतच उदयनराजे यांचा प्रवेश होणं अपेक्षित होतं. परंतु आपला पक्षप्रवेश दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, अशी उदयनराजेंची इच्छा असल्याने ते ‘वेट अँड वाॅच’वर होते.
उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाऊ नये, म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी शरद पवार यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट देखील घेतली. परंतु या भेटीनंतरही आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या उदयनराजेंनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा-
राष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला!
उदयनराजेंची नाराजी दूर? शरद पवारांशी केली २ तास चर्चा