'महाजनादेश' यात्रेला ‘शिवस्वराज्य’ यात्रेने उत्तर

पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या गळतीमुळे आवसान गाळून बसलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच युवा नेतृत्वाला वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं येत्या ६ ऑगस्टपासून महाराष्ट्रव्यापी ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढण्याचं ठरवलं आहे. या यात्रेचं नेतृत्व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघातील खासदार डाॅ. अमोल कोल्हे करणार आहेत.  

‘यांनी’ सोडली साथ

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जणू गळती लागली आहे. एकामागोमाग एक करत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे पूत्र वैभव पिचड, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांचा समावेश असून लवकरच संजीव नाईक देखील भाजपात जातील, असं म्हटलं जात आहे.  

कार्यकर्ते हवालदिल

या नेत्यांसोबत कार्यकर्तेही पक्षबदल करत आहेत. नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला आहे. पक्षातील मातब्बर नेतेच पक्ष सोडून जात असल्याने पक्षात आता उरलंय काय म्हणून कार्यकर्ते हवालदिल झालेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आपलं काही खरं नाही, असं त्यांना वाटू लागलं आहे.  

युतीला टक्कर

तर, दुसऱ्या बाजूला पुन्हा आपलीच सत्ता येणार या खुशीत युतीचे कार्यकर्ते आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच 'महाजनादेश' यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर युतीला टक्कर देण्यासाठी तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढण्यात येणार आहे. 

उदयनराजे स्टार प्रचारक

या यात्रेचे स्टार प्रचारक साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असतील. यात्रेचा शुभारंभ शिवकालीन स्थळांपासून होईल. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप सिंदखेडराजा इथं तर, सांगता किल्ले रायगडावर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   


हेही वाचा-

भाजपाची मेगाभरती! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश

शिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या