पोलीस दलाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप नसेल, नव्या गृहमंत्र्यांचं आश्वासन

माझ्याकडून प्रशासकीय कामात कुठलाही राजकीय हस्तक्षेप राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत ठरलेल्या व्यवस्थेनुसार निर्णय घेतले जातील. महाराष्ट्राला स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार देण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलिसांसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी मला प्राधान्यक्रमाने करायच्या आहेत, असं म्हणत राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी राज्यातील जनतेला आश्वास्त करण्याचा प्रयत्न केला.

गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सध्याचा काळ अत्यंत आव्हानात्मक आहे. कोरोनामुळे संपूर्ण पोलीस दल फील्डवर कार्यरत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच कोरोना काळातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी पोलीस विभागावर आहे. याच महिन्यात गुढी पाडवा, रमजान, आंबेडकर जयंती, राम नवमी आहे. हे दिवस त्या त्या धर्मियांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात.  कोरोनाचा अंदाज बघितल्यास या महिन्यात परिस्थिती अधिक आव्हानात्मक असणार आहे.

हेही वाचा- “राजरोसपणे खून पडायला लागल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही”

निष्ठा तपासणार

पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल. सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी काही राजकीय पक्षांशी संबंधित निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलिसांना इशारा दिला.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती देखील दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी दिली. सोबतच सीबीआय-एनआयए या तपास यंत्रणांना चौकशीत राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासा संदर्भातील माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा मानस असल्याचंही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

(no political interference allowed in maharashtra police department says home minister dilip walse patil)

हेही वाचा- परमबीरांना पदावरून हटवल्यावरच १०० कोटींच्या टार्गेटची आठवण कशी झाली?- राज ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या