राज्यात संपूर्ण टाळेबंदी नाही, पण…, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन होणार या चर्चेला उधाण आलं आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे. राज्यात संपूर्ण लाॅकडाऊन होण्याची शक्यता नसली, तरी लोकांनी अगदीच ऐकलं नाही, तर टप्प्याटप्प्याने कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असे स्पष्ट संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी लाॅकडाऊन संदर्भात खुलासा केला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या शेजारील गोवा, केरळ, गुजरात आणि दिल्ली राज्यांतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर खूपच कमी आहे. तरीही काेरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठिकठिकाणचे क्वारंटाईन सेंटर्स, कोविड रुग्णालयांना खाटा, आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि औषधांच्या साठ्यासह सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासन सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. 

हेही वाचा- दिलासादायक! राज्यात कोरोना मृतांच्या संख्येत विक्रमी घट

याच सोबत जनतेला देखील प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. आवश्यकता नसेल तेव्हा घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, तोंडावर मास्क घालणं गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, स्वच्छता राखा असे निर्देश सातत्याने देण्यात येत आहेत. तरीही जनेतकडून या सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये झालेली गर्दी, तर सर्वांनीच पाहिली, परंतु अजूनही बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते इ. ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क घालण्याकडे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकडे लोकं कानाडोळा करत आहेत. 

लोकं सांगूनही ऐकणार नसतील, तर नाईलाजाने टप्प्याटप्प्याने पुन्हा निर्बंध लागू केले जातील. विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उभारला जाईल. मास्क न घालणाऱ्यांकडून सक्तीने दंड वसूल करणे, रात्रीच्या फिरण्यावर तसंच बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्याबाबत विचार सुरू असून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र राज्यात संपूर्ण टाळेबंदी नसेल, त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये ,असं आवाहन देखील राजेश टोपे (rajesh tope) यांनी केलं.

राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवताना सुपर स्प्रेडर गटात मोडणारे वृत्तपत्र विक्रेते, दुकानदार, दूध विक्रेते इ. सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्यांची प्राधान्याने चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. अँटिजेन चाचणी नकारात्मक आल्यास आणि संबंधित व्यक्तीमध्ये लक्षणं दिसून आल्यास त्यांची आरटी पीसीआर चाचणी करण्याच्या सूचना दिल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कडक निर्बंधावर येत्या २ दिवसांत निर्णय, राजेश टोपेंची माहिती
पुढील बातमी
इतर बातम्या