तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ, 'या' ओबीसी नेत्याचा आरक्षणासाठी सरकारला इशारा

ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. परंतु ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये. तसं झालं तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारला दिला आहे. (OBC leader prakash shendge demands ordinance for dhangar reservation in maharashtra like maratha reservation)

मराठा आरक्षणासंदर्भात प्रकाश शेंडगे यांनी भूमिका स्पष्ट केली. आमचा मराठा आरक्षणलाा विरोध नाही. ओबीसी समाजाची भूमिका कायम मराठा आरक्षणाच्या बाजूनेच राहिली आहे. परंतु मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं तसंच ओबीसी समाजाचं वेगळं आरक्षण असावं. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यात येऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष होऊ नये, महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहावा ही आमची भूमिका आहे. सरकारनेही हा सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - शरद पवार सगळ्या विषायांवर बाेलतात, पण मराठा आरक्षणावर गप्प का?

मराठा समाजाला एससीबीसीमध्ये घालण्याचं षडयंत्र झालं आहे. ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, हे सांगण्याचा घाट काही मराठा संघटनांनी घातला आहे. काही मराठा नेता प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आरक्षणावरून ओबीसी आणि मराठ्यांचा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता होती, आता तेच दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही, याची कल्पना देखील आम्हाला आधीच होती आणि तसंच घडलं. आता सरकार मराठ्यांना आरक्षण कुठून देणार, हे कुणालाच ठाऊक नाही, मार्ग निघणं कठीण आहे. मराठा समाजाने भटक्या, मुक्तांचं आरक्षण मागू नये. ओबीसीच्या कणभर आरक्षणालाही धक्का लागल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला.

धनगर समाजाचा १ हजार कोटींचा निधी सरकारने अद्याप दिलेला दिला नाही. ओबीसीसाठी राखीव ५० टक्के निधी आम्हाला मिळायला हवा. धनगर समाजासाठी ६ आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ७४ हॉस्टेल सुरू करण्याची घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. अजून एकही हॉस्टेल सुरु झालेलं नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची सुचवला आहे. त्यानुसार धनगर समाजासाठी अध्यादेश काढावा, अशी आमची मागणी आहे. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.

हेही वाचा - Maratha Reservation : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री
पुढील बातमी
इतर बातम्या