हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न

शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? असा प्रश्न विचारत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ऊस खरेदीवरून शिवसेना मंत्र्याला धारेवर धरलं. तसंच महाविकास आघाडी सरकारकडे कारवाई देखील मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेतकऱ्याने पेटवून दिलेल्या ऊसाचे व्हिडिओ टाकत आपला संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?

आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचं कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचंच नाही.

हेही वाचा- “टिव टिव करणाऱ्या अभिनेत्यांना बोललो, तर भाजपला मिरच्या का झोंबल्या”

मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालविलाय, नेवास्यात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका!, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

तर शिवजयंतीवरील निर्बंधाबाबत बोलताना, शिवजयंतीला शिवगौरवाचे पोवाडे नाही गायचे तर काय करायचं? शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या अटकेचा तीव्र निषेध! हा महाविकास आघाडी सरकारच्या मोगलाईचा आणखी एक संतापजनक प्रकार आहे. सत्ताधारी पक्षांच्या मोर्च्यांना सूट आणि शिवजयंतीवर निर्बंध! वीजजोडण्या कापून सर्वसामान्यांचा छळ!

मोगलाई यापेक्षा वेगळी काय होती?  असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत नाही- अजित पवार
पुढील बातमी
इतर बातम्या