Advertisement

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत नाही- अजित पवार

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला कुणीही घाबरत नाही, असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत नाही- अजित पवार
SHARES

आमदारांच्या मतांची फाटाफूट होण्याची भीती वाटत असल्यानेच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात वेळकाढूपणा करत आहे, अशी टीका विरोधी पक्ष भाजपकडून होत असताना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला कुणीही घाबरत नाही, असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिलं आहे.

रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर घ्यावी, असं पत्र भगत सिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना नुकतंच पाठविलं आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला आम्ही घाबरलो असतो तर नाना पटोले यांना राजीनामाच देऊ दिला नसता. सरकार चालवताना कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी असावी लागते. तशी आमचीही आहे. महाविकास आघाडीला १७० आमदारांचं पाठबळ आहे. येणारं अधिवेशनच नाही, तर अशा बऱ्याच अधिवेशनात आम्हाला कामकाज करायचं आहे. आमदारांचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलंही विधेयक मंजूर होऊ शकत नाही.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, राज्यपालांचं सत्ताधाऱ्यांना पत्र

परस्पर विरोधी विचारधारा असलेलं हे सरकार ३ महिने चालेल असं विरोधकांकडून म्हटलं जायचं, त्यानंतर हे सरकार ६ महिने चालेल, ९ महिने चालेल, १२ महिने चालेल, असं म्हटलं जाऊ लागलं. आता तर सरकारला सव्वा वर्ष झालं आहे. विरोधक प्रत्येक वेळी तीन-तीन महिने ते वाढवत आहेत. सध्या तरी या सरकारला कुठलाही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय व्यवस्थितपणे काम करत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तिन्ही पक्ष एकोप्याने काम करत आहेत. कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावर तिन्ही पक्षांचे प्रमुख मिळून निर्णय घेतात, सरकारला मार्गदर्शन करतात. सर्व निर्णयात तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असतो. पक्षाच्या हायकमांडने सांगितल्यानंतर नाना पटोले यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटूनच राजीनामा दिला होता. आम्हाला भीती वाटत असती, तर त्यांना तिथंच अडवलं असतं, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

विधानसभेत बहुमत असतानाही आपल्याच आमदारांवर सरकारचा विश्वास नाही. असं घाबरट सरकार आतापर्यंत पाहिलं नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली होती.

(ajit pawar replies devendra fadnavis on maharashtra vidhan sabha president election)

हेही वाचा- दादांच्या मनातलं ओळखणारी भाषा शिकायचीय- उद्धव ठाकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा