महाराष्ट्रात आत्महत्येचं पर्यटन करताय का? फडणवीसांनी दिलं चौकशीचं खुलं आव्हान

आम्हाला धमक्या द्यायच्या नाही, आम्ही धमक्यांना घाबरणारी लोकं नाहीत. माझं खुलं आव्हान आहे की माझी चौकशी करा. कर नाही त्याला डर कशाची, असं म्हणत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी गृहमंत्र्यांना खुलं आव्हान दिलं.

सचिन वाझेंना हटवण्याचं गृहमंत्र्यांनी अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत कबूल केलं, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी निर्णय बदलल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

त्याआधी विधानसभेत सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार वाझेंना का पाठिशी घालताय? सचिन वाझेंचं निलंबन करणार की नाही हे आम्हाला आधी कळालं पाहिजे. महाराष्ट्रात आत्महत्येचं पर्यटन करता आहात का? हे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगावं. 

हेही वाचा- “यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणल्यामुळेच…”

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. भास्कर जाधव आम्हाला धमक्या द्यायच्या नाही. आम्ही धमक्यांना घाबरणारी लोकं नाही. माझं खुलं आव्हान आहे की माझी चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाची. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. पण सचिन वाझेवर कारवाई का नाही? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, मुख्यमंत्री कुठे आहेत? ते सभागृहात येऊन यावर निवेदन का देत नाहीत? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. सभागृहातील प्रचंड गोंधळामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं.

त्याआधी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. परंतु सचिन वाझे जर तपास अधिकारी असतील, तर यांचं बिंग फुटेल. यांना बेड्या पडतील. म्हणून ते सचिन वाझेंच्या मागे लागले आहेत, असा दावा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.

तर गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी यशदा नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी तक्रार दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक आत्महत्येचं प्रकरण दाबलं. त्याची आम्हाला चौकशी करायची आहे.” असं म्हणत इशारा दिला.

(opposition leader devendra fadnavis ready for inquiry in anvay naik suicide case)

हेही वाचा- मनसुख हिरेन यांची हत्याच, देवेंद्र फडणवीसांनी थेट जबाबच वाचून दाखवला
पुढील बातमी
इतर बातम्या