मनसुख हिरेन यांची हत्याच, देवेंद्र फडणवीसांनी थेट जबाबच वाचून दाखवला

सचिन वाझे यांना कोण आणि कशासाठी त्यांना वाचवित आहे? याचा खुलासा होणं गरजेचं असून वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मनसुख हिरेन यांची हत्याच, देवेंद्र फडणवीसांनी थेट जबाबच वाचून दाखवला
SHARES

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानीसमोर स्फोटकांनी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळून आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयीत मनसुख हिरेन याने आत्महत्या केली नसून त्यांची हत्याच झाली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. त्यांचा खून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच केला असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने FIR मध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना कोण आणि कशासाठी त्यांना वाचवित आहे? याचा खुलासा होणं गरजेचं असून वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेतील आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करताना मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात एफआयआरसोबत नोंदवण्यात आलेला त्यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. या जबाबात त्यांनी म्हटलं आहे की, आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर २०२० मध्ये सदर कार वापरण्याकरीता दिली होती. सदरची कार त्यांनी ५-२-२०२१ रोजी त्यांच्या चालकामार्फत पाठवून माझ्या पतीच्या दुकानावर आणून दिली. म्हणजे ४ महिने ही गाडी सचिन वाझे यांच्याकडे होती, असा दावा  फडणवीस यांनी केला.

२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर रात्री १०.३० वाजता घरी आले. दिवसभर ते सचिन वाझेंसोबत होते, असं त्यांनी मला सांगितलं. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वाझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. नोंदवलेल्या जबाबाची प्रत घरी आणून ठेवली. त्यावर सचिन वाझे यांची स्वाक्षरीदेखील आहे, असं तक्रारीत नमूद आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वाझेंसोबत होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

२ मार्च रोजी माझे पती दुकानातून घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते सचिन वाझे यांच्यासोबत मुंबईला गेले होते. आणि त्यांच्या (सचिन वाझे) सांगण्यावरुन वकील गिरी यांच्याकडून पोलीस आणि मीडियामधून फोन येत असल्याने त्रास होत असल्याबद्दलची तक्रार मा. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त बृहन्मुबई आणि ठाणे यांच्या नावे तयार करून घेतली व त्यांना दिली असल्याचं त्यांनी मला सांगितलं.

माझ्या पतीकडे पोलिसांनी काही मारहाण केली का? काही त्रास दिला का? याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही असं सांगितलं. पण चौकशी झाल्यानंतरही पोलीस वारंवार फोन करत असल्याने तक्रार दिल्याचं सांगितलं, म्हणजे जो तक्रार अर्ज मीडियात आला तोही सचिन वाझे यांनी करून दिला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावर अनिल देशमुख म्हणाले...

त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी माझे पती नेहमीप्रमाणे दुकानात गेले व दुकान बंद करून ९ वाजता नेहमीच्या वेळेत घरी आले. त्यावेळी रात्री माझ्या पतीने सांगितलं की, सचिन वाझे बोलत आहेत की तू सदर केसमध्ये अटक हो. २ ते ३ दिवसांमध्ये मी तुला जामिनावर काढतो. मी त्यावेळी माझ्या पतीला सांगितलं की तुम्ही अटक होण्याची काहीच गरज नाही. आपण कुणाकडून तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी ते थोडे टेन्शनमध्ये वाटत होते. त्यानंतर ४ मार्च २०२१ रोजी माझ्या पतीने माझ्या मोबाईलवरून विनोद हिरेन माझे दिर यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल, तेव्हा चांगल्या वकिलाशी बोलून माझ्या अटकपूर्व जामिनासाठी बोलणी करून ठेव, असं सांगितलं आणि दुकानात निघून गेले.

संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

२०१७ च्या एका खंडणी प्रकरणातला एक एफआयआर आहे. या एफआयआरमध्ये २ लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याची नोंद आहे. या प्रकरणात ज्या दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला, त्यापैकी एकाचं नाव धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव सचिन वाझे असं आहे. महत्त्वाचं म्हणजे मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. ४० किमी दूर मृतदेह सापडतो…गावडेकडे जाण्याचं कारण काय आहे. याच्यापेक्षा अधिक काय पुरावे हवेत?  ३०२ तर सोडून द्या पण २०१ अंतर्गत सचिन वाझेंना तात्काळ अटक का होत नाही? हा राजकारणचा विषय नाही. पण थेट पुरावे असतानाही २०१ अंतर्गत अटक होत नसेल, तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गावडेंच्या परिसरात मनसुख हिरेन यांची गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती तर ती परत कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला, त्यामुळे हे उघडकीस आलं आहे. त्यामुळे सचिन वाझेंना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

(opposition leader devendra fadnavis demands to arrest police officer sachin vaze in mansukh hiren death case)

हेही वाचा- मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा