अधिवेशन ४ आठवड्यांचं करा, विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन २ आठवड्यांएेवजी ४ आठवड्यांचं करावं अशी मागणी विरोधकांनी सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. मराठा-धनगर आरक्षण, दुष्काळ यासह अनेक मुद्दे चर्चेसाठी असताना अधिवेशन केवळ ९ दिवस चालणार आहे. त्यामुळं अधिवेशनाचा काळ ४ आठवडे करावा, अशी विरोधकांची मागणी आहे.

९ दिवसच काम

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे आरक्षण गाजत असून आरक्षण आणि दुष्काळ हेच मुद्दे एेरणीवर असल्याचं चित्र आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार असून या दोन आठवड्यातील सुट्ट्या वगळता प्रत्यक्षात ९ दिवसच अधिवेशन चालणार आहे.

कुठले विषय चर्चेत?

आरक्षण, दुष्काळ, अवनी वाघीणीची हत्या, शेतकर्यांची कर्जमाफी, कर्जमाफीतील गोंधळ, अंगणाडी सेविका, शिक्षकांचे प्रश्न, राज्यातील कायदा-सुव्यवस्था यासारखे अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी आहेत. पण त्यासाठी अधिवेशनाचा काळ पुरेसा ठरणार नाही. त्यामुळं विरोधकांकडून सुरूवातीपासूनच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत दिली होती.

त्यानुसार सोमवारी ५.३० वाजता विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी राज्यपालांकडे ठेवली आहे. २ आठवड्यांएेवजी ४ आठवड्यांचं अधिवेशन करण्याची विरोधकांची मागणी आहे.


हेही वाचा-

मराठा आरक्षण वादात... ओबीसी संघटना न्यायालयात देणार आव्हान

ठाण्यात सरकारविरोधात मनसेचा महामोर्चा, वाहतुकीचा ठिकठिकाणी खोळंबा


पुढील बातमी
इतर बातम्या