पंतप्रधान मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार: संजय निरुपम

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी वाराणसी येथील प्रचारादरम्यान बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची उपमा देत, त्यांच्या धोरणावर घणाघाती टीका केली.

मंदिरं तोडली

पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ काॅरिडाॅरचं काम करण्याच्या नावाखाली काशीतील शेकडो मंदिरं पाडली आहेत. बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी ५५० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहेत. मुघल बादशहा औरंगजेबाने वाराणसीवर हल्ला करून तिथली अनेक मंदिरं पाडली होती. काशीच्या हिंदू नागरिकांवर जिझीयासारखा जाचक कर बसवला. परंतु औरंगजेब जेव्हा काशीतील मंदिरं तोडायला आला; तेव्हा येथील लोकांनी त्याला मंदिरं पाडू दिली नव्हती. 

मोदींचा निषेध

मात्र, भारतातील हिंदू धर्मियांना न्याय मिळवून देण्याच्या बाता मारणारे मोदी काशीतील मंदिरं तोडून औरंगजेबाची कसर पूर्ण करत आहेत. जे औरंगजेबाला करता आलं नाही, ते मोदी करत आहेत. अशा आधुनिक औरंगजेबाचा मी निषेध करतो, अशा शब्दांत निरूपम यांनी मोदींवर टीका केली.  

वाराणसीची निवडणूक जवळ आल्याने विरोधकांच्या हल्ल्याला धार चढत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींनी मोदींची तुलना महाभारतातील खलनायक असणाऱ्या दुर्योधनाशी केली होती.  


हेही वाचा-

तर, उद्धव मातोश्री सोडून गेले असते, राणेंच्या आत्मचरित्रातला गौप्यस्फोट

कारागृह कैद्यांनी ओव्हरलोड; क्षमतेपेक्षा १३४ टक्के जास्त कैदी


पुढील बातमी
इतर बातम्या