मोदींचा मातोश्रीवर 'संपर्क फाॅर समर्थन' काॅल

शिवसेना मित्रपक्ष भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसताना भाजपाकडून मात्र सातत्याने शिवसेनेला गोंजरण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. याचं ताज उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. राज्यसभा उपाध्यक्षाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना 'समर्थन' दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे 'संपर्क' करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

'अशी' झाली निवडणूक

जेडीयूचे खा. हरिवंश सिंह राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एनडीएतर्फे उभे होते. तर विरोधी पक्षाकडून बी.के. हरिप्रसाद यांना उभं करण्यात आलं होतं. हरिवंश यांना १२५, तर हरिप्रसाद यांना १०५ मतं मिळाली. राज्यसभा खा. पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ संपल्यापासून जून महिन्यापासून हे पद रिक्त होतं. या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएच्या बाजूने मतदान केलं. या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याकरिता शहा यांनी उद्धव यांच्याशी फोनवरही चर्चा केली होती.

विरोधक आक्रमक

गेल्या काही महिन्यांपासून संसदेत विरोधक आक्रमक झाले असून काही दिवसांपूर्वीच सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे हा अविश्वास ठराव भाजपाचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीने आणला होता. हा अविश्वास ठराव भाजपाने १२६ विरोधी ३२५ मतांनी जिंकला असला, तरी या मतदानावेळी शिवसेना गैरहजर राहिली होती.

भाजपला हवा मित्रपक्ष

निवडणुका जवळ आल्याने शिवसेनेसारखा मित्रपक्ष गमावणं भाजपला परवडणारं नाही. यामुळे २ महिन्यांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'संपर्क फाॅर समर्थन' अभियानाअंतर्गत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.


हेही वाचा-

हिंसक मराठा आंदोलकांवर कारवाई करा! उच्च न्यायालयात याचिका दाखल

'राम मंदिर जरूर बांधा' पण त्याआधी 'हे' करा! - मनसे


पुढील बातमी
इतर बातम्या