अशा नोटिशींना मनसे भीक घालत नाही- संदीप देशपांडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचं समजतं आहे. मात्र, या नोटिशीविरोधात मनसेनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरे यांना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र, अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील’, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

चौकशीसाठी हजर 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठविली असून, येत्या २२ ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच, या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली असून, उन्मेष जोशी इडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

सूडाचं राजकारण

'राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचं जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार सूडाचं राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज ठाकरे यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू', असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.


हेही वाचा -

पुरामुळं महागली साखर! ४० रुपये किलोवर गेले दर

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज


पुढील बातमी
इतर बातम्या