औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये (Aurangabad) १ मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाऊ शकते.

दुपारी १२ वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसंच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे.

दरम्यान, बुधवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभास्थळाची पाहणी केली. तसंच पोलिसांचीही भेट घेतली होती. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं.

मनसे कार्यकर्त्यांनी सभेची तयारी सुरू केली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. तसेच, सभास्थळ असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर व्यासपीठ उभारणीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्तही ठेवला आहे. त्यामुळे कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवू नये यासाठी त्याच जलद कृती दलालाही सज्ज ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये CrPC कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नव्या आदेशानंतर जिल्ह्यात ९ मेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरू झालं.


हेही वाचा

शिवाजी पार्कात नमाज पठणासाठी परवानगी द्या, औरंगाबादच्या वकिलाची मागणी

केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक, मुख्यमंत्र्यांची नाराजी

पुढील बातमी
इतर बातम्या