शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष बनवा, रामदास आठवलेंचा सल्ला

सध्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी बसवण्यास एकही आश्वासक चेहरा मिळत नसल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चक्क काँग्रेसचा अध्यक्ष बनवा, असा सल्ला रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यासाठी एक फाॅर्म्युला देखील काँग्रेसला सुचवला आहे. (ramdas athawale gives advice to congress must select sharad pawar as a president)

रामदास आठवले म्हणतात, काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.

हेही वाचा - ‘हे’ तर राहुल गांधीचं नेतृत्व बोथट करण्याचं षडयंत्र, काँग्रेस नेत्याचा दावा

मागील लोकसभा (२०१९) निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा बनल्या. तेव्हापासून काँग्रेस पक्ष पूर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतिक्षेत आहेत.

त्यातच काँग्रेसमधील ५ माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्राद्वारे पक्षाला एक पूर्णवेळ, सतत कार्यरत असणारे आणि सतत उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रावरूनही बराच गदारोळ झाला होता.

देशाची अर्थव्यवस्था बिकट स्थितीत आहे. चीनसोबतही दररोज चकमकीचं वृत्त येत आहे. याव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. असं असतानाही पक्षाकडे पूर्णवेळ नेतृत्व नसल्यामुळे विरोधीपक्षाची भूमिका योग्यरित्या पार पाडू शकत नाही, असं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं.  

हेही वाचा - तर, महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडू, काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
पुढील बातमी
इतर बातम्या