Advertisement

तर, महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडू, काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली, तर आम्ही राज्यातील सत्ता सोडू, असं मत काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

तर, महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडू, काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
SHARES

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली, तर आम्ही राज्यातील सत्ता सोडू, असं मत काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं वादाची नवी ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे. (congress ready to quit maha vikas aghadi government says vijay wadettiwar)

काँग्रेस कार्य समितीच्या (CWC) समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली असून राहुल गांधी यांनीच पुन्हा काँग्रेसचं अध्यक्षपद ताब्यात घ्यावं, असं काही नेत्यांचं मत आहे. विजय वडेट्टीवार यांनीही राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत राहुल गांधी फारसे अनुकूल नव्हते. परंतु सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांनी फारसा विरोधी केला नाही, असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असूनही सहकारी पक्षांकडून निर्णय प्रक्रियेत महत्त्व दिलं जात नसल्याची नाराजी राहुल गांधी यांनी मागे बोलून दाखवली होती. 

तोच धागा पकडून विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत राहुल गांधी यांचाही सहभाग होता. त्यांनी सखोल चर्चा करूनच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास होकार दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा त्यांची निवड झाली आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याच्या सूचना केल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

हेही वाचा - ‘हे’ तर राहुल गांधीचं नेतृत्व बोथट करण्याचं षडयंत्र, काँग्रेस नेत्याचा दावा

गांधी घराण्यातीलच व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष व्हावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही नेहमीच हायकमांडच्या निर्णयासोबत राहू, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. 

काँग्रेसमधील ५ माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आजाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्‍बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद यांचा समावेश आहे.

तसंच माजी मुख्‍यमंत्र्यांमध्ये भूपिंदरसिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, एम. वीरप्‍पा मोइली, पृथ्‍वीराज चव्‍हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी और मिलिंद देवडा या नेत्यांचाही यात समावेश आहे. काँग्रेसचे नेते राज बब्‍बर, अरविंदरसिंह लवली आणि कौल सिंह यांनी या पत्राचे स‍मर्थन केले आहे. अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्‍त्री आणि संदीप दीक्षित यांच्या देखील सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रामध्ये सह्या आहेत.

राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या आक्षेप घेणाऱ्या या पत्रानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट नव्या नेतृत्वाची मागणी करत आहे, तर दुसऱ्या गट सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं किंवा राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावं, असं म्हणत आहे.

हेही वाचा - शिवसेना काँग्रेसविरोधात आंदोलन करणार का? आशिष शेलारांचा सवाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा