२४ तासातच पंकजा मुंडे 'पण' विसरल्या, धनगर आमदाराने करून दिली आठवण

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही, असा 'पण' राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच नांदेड इथं केला होता. याला काही तासही उलटले नाहीत तोवर या 'पण' त्या विसरल्या आहेत. पंकजा मुंडे या आपला 'पण' विसरल्या असल्या तरी आम्ही मात्र तो विसरला नसल्याचं म्हणत धनगर आमदार रामराव वडकुतेंनी अखेर पंकजा मुंडेंना त्यांनी केल्याची 'पण' ची आठवून करून दिली. पंकजा मुंडे मंगळवारी नेहमीप्रमाणे मंत्रालयात आल्या असता त्यांना वडकुते यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अडवलं. पंकजा यांना मंत्रालयात पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तुमच्यासोबत मेंढराप्रमाणं येऊ

धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नुकतीच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथं खंडोबाच्या जत्रेत धनगर आरक्षण जागर परिषद घेण्यात आली. या परिषदेत बोलताना मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला वचन देते की तुमचा आरक्षणाचा विषय संपेपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही असा 'पण' त्यांनी  केला. आम्ही पुन्हा सत्ता काबीज करणार आहोत. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. तर धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर येऊन तुमच्यासोबत मेंढराप्रमाणं येण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी 

हे वचन देऊन काहीच तास उलटले असताना मंगळवारी पंकजा मुंडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत आल्या. त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण यावेळी वडकुते यांनी त्यांना अडवलं आणि त्यांचा मंत्रालयात पाऊल न ठेवण्याचा 'पण'  आठवून देण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावल्याचं समजतं.

पंकजांचं घुमजाव

जोपर्यंत धनगर आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मंत्रालयात प्रवेश होणार नाही. म्हणजेच जोपर्यंत धनगर आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत आमचा पक्ष मंत्रालयात परत येऊ शकणार नाही, असं मी म्हटल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रसारमाध्यमांना देत पंकजा मुंडे यांनी घुमजाव केलं आहे. मिडीयानेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगण्यासही त्या यावेळी विसरल्या नाहीत.


हेही वाचा -

आता गरीब सवर्णांनाही १० टक्के आरक्षण

अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच 'पटकवले’, विसरलात का? -संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या