‘हे’ तर काँग्रेसलाच संपवण्याचं षडयंत्र!

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी)चं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या हाती सोपवण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा सगळा खटाटोप म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधातीलच नव्हे, तर काँग्रेसलाच संपवण्याचं षडयंत्र असल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे.

संजय निरूपम यांनी ट्विट करून दावा केला आहे की, शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद बहाल करण्याच्या उठलेल्या वावड्या म्हणजे सध्या दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात जी माेहीम सुरू आहे, त्याचाच भाग आहे. याच अभियानांतर्गत २३ जणांच्या सह्या असलेलं पत्र लिहिण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील सातत्यात असलेली कमतरता शोधण्यात आली. ही एक मोठी योजना आहे, काँग्रेसलाच संपवण्याची, असा आरोप निरूपम यांनी केला आहे.

हेही वाचा- शरद पवार यूपीएचे अध्यक्ष? राष्ट्रवादीनेच केला खुलासा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये शरद पवार आणि यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत ज्या बातम्या प्रसारीत होत आहेत, त्या सर्व निराधार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटलं आहे. यूपीएमध्ये अशा कुठल्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नाही. सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काही जणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे, असंही तापसे म्हणाले.

तर ज्या प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहेत, त्याची कल्पना शरद पवार यांनाही नसेल. काँग्रेस (congress) पक्ष जेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना करण्यात आली होती. सर्वात मोठ्या पक्षातूनच यूपीएचा अध्यक्ष होतो. आजही विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच असल्याने काँग्रेसचाच अध्यक्ष असेल, यात शंका नाही. देशात शेतकरी आंदोलनाने जोर पकडलेला असताना गोंधळ निर्माण करण्यासाठी वा लोकांचं लक्ष या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठीच अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी केला. 

(sanjay nirupam reacts on sharad pawar and upa chairmanship)

हेही वाचा- सिडकोने पोलिसांच्या घरांच्या किमती ३ लाखांनी वाढवल्या, मनसेचा आंदोलनाचा इशारा
पुढील बातमी
इतर बातम्या