मुख्यमंत्र्यांनी फणा काढण्याची गरज नाही - शिवसेना

शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं, असं खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही. मी पक्षाची भूमिका मांडत आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. शिवसेनेच्या वतीने जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे घेतील, तेच याबाबत बोलतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना आणि भाजपात ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही. पुढील पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.  यावर संजय राऊत म्हणाले, की,  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४५ जागा असतील तर त्यांना कोण रोखणार? उद्या खडसे म्हणाले माझ्याकडे १४५ लोक आहेत त्यांना कोण रोखणार? माझ्याकडे १४५ लोक असतील मला कोण रोखणार? शरद पवार १४५ जागा घेऊन आले त्यांना कोण रोखणार? ज्यांच्याकडे एकने जास्त आमदार असेल तो मुख्यमंत्री होईल सरकार बनवेल.

शिवसेना-भाजप हे एक कुटुंब असून भाजप मात्र कुटुंबासारखे वागत नाही, असं शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला जे आश्वासन दिले होते, ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भाजपावरील विश्वास उडेल, असंही केसरकर म्हणाले.


हेही वाचा -

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात, संजय काकडे यांचा दावा


पुढील बातमी
इतर बातम्या