मलबार हिल नव्हे रामनगरी? मामांची मलबारहिलच्या नामांतराची मागणी

शहरं, रेल्वे स्थानक, विद्यापीठ, रस्ते अशा सर्वच ठिकाणांची नाव बदलण्याच्या मागणीचा ट्रेण्ड सध्या जोरात आहे. अयोध्येपासून सुरू झालेला हा ट्रेण्ड आता मुंबईतील मलबारहिलपर्यंत येऊन पोहोचला आहे. मलबार हिलचं नाव बदलून रामनगरी करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे अर्थात मामांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात ठरावाच्या सुचनेद्वारे आपण ही मागणी ठेवली आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सभागृहात ही मागणी नक्कीच मंजूर होईल, असा विश्वास लांडे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे.

नामांतराला जोर

मुंबईत राम मंदिर नावानं नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात आलं असून नुकतंच एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी असं करण्यात आलं आहे. त्याचवेळी माटुंगा, दादर आणि अन्य रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी जोर धरत असून समृद्धी महामार्गालाही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी आहे.

राम नाम

एकूणच सध्या एकीकडे नामांतराचा ट्रेण्ड जोरात असून दुसरीकडे राम मंदिराचा मुद्दाही गरम आहे. म्हणूनच शिवसेनेनं राममंदिराचा मुद्दा उचलत अयोध्या दौराही केला. त्याचाच प्रभाव मुंबईतही दिसून येत असून त्यातूनच मलबार या उच्चभ्रू वस्तीचं नामांतर राम मंदिर करण्याची मागणी लांडे यांनी केली आहे.

काय म्हणाले लांडे?

'एेक मुंबई तुझी कहाणी' या पुस्तकातील मलबार हिलचा इतिहास वाचताना त्यात या ठिकाणी राम आणि लक्ष्मणाचं काही काळ वास्तव्य होतं. जिथं सध्या मलबार हिल परिसर आहे त्या ठिकाणी एक सुंदर निसर्गरम्य वन होतं. सीतेच्या शोधात आलेल्या या दोघांना ही जागा आवडली आणि तिथं त्यांनी काही काळ वास्तव्य केलं. त्यामुळं राम-लक्ष्मणाच्या स्पर्शानं ही भूमी पावन झाल्यानं त्याला रामनगरी असं नाव द्यावं, अशी आपली मागणी असल्याचं लांडे यांनी सांगितलं आहे.

याआधीही मागणी

दरम्यान २०१३ मध्येही लांडे यांनी हि मागणी केली होती आणि त्याला भाजपाचा पाठिंबा मिळाला होता. मात्र ही मागणी काही मान्य होऊ शकली नाही. त्यामुळं लांडे यांनी पुन्हा ही मागणी उचलून धरली आहे. १३ डिसेंबरच्या महापालिकेच्या सभागृहात यासंबंधीचा ठराव मांडण्यात येणार असून ही मागणी मान्य होते का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा-

मनसेत भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून लांडे शिवसेनेत गेले- संदीप देशपांडे

दिलीप लांडे यांच्याविरोधात मनसेची फ्लेक्सबाजी


पुढील बातमी
इतर बातम्या