राम जन्मभूमी जमीन घोटाळा?, शिवसेनेची चौकशीची मागणी

असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाच मंदिर उभ राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असं म्हणत शिवसेनेने या घाेटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातील अग्रलेखातून या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. अग्रलेखात नमूद केल्यानुसार, असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे. राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही, पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. 

फक्त १० मिनिटांपूर्वी २ कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे. खासदार संजय सिंह म्हणतात की, ‘‘भगवान श्रीराम यांच्या नावाने कोणी घोटाळा करू शकेल याची कल्पनाही करू शकत नाही, पण माझ्या हाती पुराव्याची सबळ कागदपत्रे आहेत. 

हेही वाचा- राम मंदिर वर्गणी: राऊतांच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांचं टीकास्त्र

रामजन्मभूमी स्थानावर मंदिर निर्माण करावे यासाठी रामलल्लांच्या नावाने अयोध्येत बँक खातं उघडण्यात आलं असून त्या खात्यावर जगभरातील कोट्यवधी श्रद्धाळूंनी शेकडो कोटी जमा केले आहेत. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे ४ हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोट्यवधी रुपये जमा झाले. शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आलं. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभं राहिलं. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा- राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेले १ कोटी गेले कुठे?- अनिल देसाई
पुढील बातमी
इतर बातम्या