नगरसेवक वाद: मनसेनंतर शिवसेनेनेही मागितली सुनावणी

मुंबई महापालिकेतील मनसेच्या ६ नगरसेवकांनी फुटून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या सर्वांची शिवसेनेतील विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, या ६ नगरसेवकांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला मनसेने हरकत घेत त्यांना मान्यता देण्यापूर्वी आपल्याला सुनावणी देण्याची मागणी केली. मनसेच्या मागणीनंतर आता शिवसेनेनेही या प्रकरणी सुनावणीची मागणी कोकण विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे मागणी?

मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मोरे आणि दत्ता नरवणकर आदी ६ नगरसेवकांनी एकत्रपणे मनसेतून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना आपले निवेदन दिल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानुसार या सर्व नगरसेवकांना शिवसेनेत विलिन करण्याचं पत्र शिवसेनेने कोकण विभागीय आयुक्तांना दिलं आहे. त्याला मनसेने हरकत घेत या विलिनीकरणाला मान्यता देण्यापूर्वी आपल्याला सुनावणी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कुठलाही अडथळा नाही

मनसेने केलेल्या सुनावणीनंतर सोमवारी सकाळी शिवसेनेनेही कोकण विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मनसेला सुनावणी दिली जाणार असेल, तर आपल्यालाही आमचे मत मांडण्यासाठी सुनावणी दिली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचं सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगितलं. मात्र, या सर्व नगरसेवकांची कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना शिवसेनेत सामील करून घेतलं जात आहे. त्यामुळे या सर्वांच्या प्रवेशाबाबत कोणताही अडथळा येईल, असं आपल्याला वाटत नसल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा -

मनसैनिकांना भिडणार भिमसैनिक


पुढील बातमी
इतर बातम्या