मनसैनिकांना भिडणार भिमसैनिक

गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवरील देशाच्या दुष्मनांशी लढावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा समाचार घेतला आहे.

SHARE

मुंबईतील फेरीवाल्यांना हटवण्याची डेडलाईन रेल्वे पोलीस आणि महापालिका प्रशासनाला देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आव्हान दिले आहे. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवरील देशाच्या दुष्मनांशी लढावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा समाचार घेतला आहे. गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाल्यास गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे.


मनसेच्या मोहिमेचा विरोध

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुघर्टनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढून फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली होती. पुढील १५ दिवसांमध्ये फेरीवाल्यांना हटवल्यानंतरही ते तिथे बसलेले दिसल्यास मनसे स्टाईलने त्यांना हटवले जाईल, असा इशारा मनसेने दिला होता. त्यानुसार शनिवारी त्यांची डेडलाईन संपली असून शनिवारीच त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधातील मोहीम हाती घेतली. फेरीवाल्यावर मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.


दादागिरी करू नये

फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याबद्दलची तक्रार पोलीस प्रशासनाला करता येऊ शकते. त्यांच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करेल. मात्र, मनसेने कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी दाखवत हल्ले करू नयेत. फेरीवाल्यांवर ज्या मनसैनिकांनी हल्ले केले आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि मनसैनिकांना चोख उत्तर देतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.हेही वाचा -

डबल स्ट्राईक, फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडात दुपटीने वाढ


संबंधित विषय
ताज्या बातम्या