लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; मुंबईतून शेवाळे, किर्तीकर आणि अरविंद सावंत

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा पाठोपाठ शुक्रवारी शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. युतीसाठी २५-२३ चा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यानुसार शिवेसनेने आपल्या कोट्यातील २३ जागांपैकी २१ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. परंतु सातारा आणि पालघरच्या जागेसाठी  उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये या नावांचीही घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसनेच्या पहिल्या २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, तर उत्तर पश्चिम मुंबईतून पुन्हा एकदा गजानन किर्तीकर यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मित्रपक्षात असलेल्या स्वाभिमानी पक्षाच्या सदाभाऊ खोत यांच्या आशा मावळल्या आहेत. खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यास सदाभाऊ इच्छुक होते. परंतु शिवसेनेने या ठिकाणी आपला उमेदवार उभा केल्यामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे.

वनगांच्या उमेदवारीवर सस्पेंस

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांना भाजपाने संधी दिली होती. तर चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी वनगा यांनी गावित यांना टांगलीच टक्कर दिली होती. त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणाहून पुन्हा वनगा यांनाच उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत श्रीनिवास वनगा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल का हा सवाल या निमित्तानं विचारला जाऊ लागलाय.

शिरूरमध्येही काँटे की टक्कर

शिरूर मतदारसंघातून विद्यामान खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवबंधन तोडून पक्षात आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी अढळराव पाटील आणि डॉ. कोल्हे यांच्या शाब्दीक चकमकही झाली होती. त्यामुळे या ठिकाणी दोघांमध्येही सामना रंगण्याची शक्यता आहे.

गायकवाडांचा पत्ता कट

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. रवींद्र गायकवाड हे विमानप्रवासात कर्मचाऱ्यास चप्पल मारल्यामुळे चर्चेत आले होते.

 

कोण आहेत उमेदवार?

दक्षिण मुंबई : अरविंद सावंत

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे

उत्तर पश्चिम : गजानन किर्तीकर

ठाणे : राजन विजारे

रायगड : अनंत गिते

रत्नागिरी : विनायक राऊत

कोल्हापूर : संजय मंडलिक

हातकणंगले : धैर्यशील माने

नाशिक : हेमंत गोडसे

शिर्डी : सदाशिव लोखंडे

शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील

बुलडाणा : प्रतापराव जाधव

अमरावती : आनंदराव आडसूळ

रामटेक : कृपाल तुमाने

यवतमाळ-वाशिम : भावना गवळी

परभणी : संजय जाधव

औंरंगाबाद : चंद्रकांत खैरे

कल्याण : श्रीकांत शिंदे

मावळ : श्रीरंग बारणे

धारशीव : ओमराजे निंबाळकर

हिंगोली : हेमंत पाटील


हेही वाचा -

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

पालघर लोकसभेसाठी 'बविआ'ला 'माकप'ची साथ


पुढील बातमी
इतर बातम्या