आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं, शिवसेनेने पटोलेंना सुनावलं

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचं खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा ताणतणाव निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. पटोले यांच्या वक्तव्यावर टीका करताना आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं, असं शिवसेनेचे (shiv sena) खासदार अरविंद सावंत यांनी सुनावलं आहे.

न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद सावंत (arvind sawant) म्हणाले, नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये. 

तुम्हाला काही अडचण आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा; पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या वक्तव्यावर नाना पटोले यांचा खुलासा

नाना पटोले यांनी लोणावळा इथं झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आपल्यावर पाळत ठेवून आहेत. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा खळबळजनक दावा केला.

सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस (congress) उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केला होता.

हेही वाचा- तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले
पुढील बातमी
इतर बातम्या