यूपीतल्या साधू हत्याकांडावरून राऊतांचा भाजपला टोमणा, म्हणाले पालघरसारखं राजकारण नको

उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या हत्याप्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील. पण ज्या पद्धतीने पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देऊन त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसा प्रयत्न या घटनेबाबत होऊ नये, असं आवाहन करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.

आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलेल्या मेसेजमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे, या विषयाचे कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी अदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील. 

तसंच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची योगी अदितयनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करत साधू हत्येबाबत चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटना घडतात, तेव्हा राजकारण न करता आपण एकत्र काम करून गुन्हेगाराना शासन केलं पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा - पालघर हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा, हायकोर्टात याचिका

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं.

ही घटना पोलिसांच्या डोळ्यादेखत झाल्याने विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरू केली. शिवाय याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती.  

हेही वाचा - गृहमंत्र्यांची हाकालपट्टी करा, पालघर घटनेवरून चंद्रकांत पाटलांची मागणी
पुढील बातमी
इतर बातम्या