Advertisement

गृहमंत्र्यांची हाकालपट्टी करा, पालघर घटनेवरून चंद्रकांत पाटलांची मागणी

राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

गृहमंत्र्यांची हाकालपट्टी करा, पालघर घटनेवरून चंद्रकांत पाटलांची मागणी
SHARES
Advertisement

पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत २ साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

काय म्हणाले पाटील?

पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत २ साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आली. हा प्रकार निषेधार्ह आहे. त्यामुळे साधूंच्या हत्याकांडातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसंच घटनास्थळी उपस्थित असूनही साधूंना वाचविण्यासाठी काहीही न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. 

पालघरच्या गंभीर घटनेनंतर खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: हून जनतेशी संवाद साधायला हवा होता. परंतु विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आवाज उठवला. सोशल मीडियावरून राज्य सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केल्यानंतर मुख्यमंत्री ४ दिवसांनी जनतेसमोर आले.

हेही वाचा - पालघरमधील हत्या माणुसकीला काळीमा फासणारी-अजित पवार

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

राज्यात मागील काही दिवसात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकाेनातून अत्यंत गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. संचारबंदीच्या काळातही हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हव्या असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सवलतीचं पत्र देण्यात आलं. वांद्र्यात हजारोंच्या जमावाने गोंधळ घातला. त्या पाठोपाठ पालघर हत्याकांड घडलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून या तमाम घटनांची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. 

हेही वाचा - पालघर हत्या: योगी आदित्यनाथांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, कडक कारवाईची मागणी


संबंधित विषय
Advertisement