
पावसाळा ओसरत असताना मुंबईत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड, हिपॅटायटिस-A आणि तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिस (Acute Gastroenteritis) यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई येथील तज्ज्ञांच्या मते, मुसळधार पावसानंतर साचलेले पाणी हे डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. तसेच दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.
डॉक्टरांच्या मते, उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, सतत उलट्या होणे, पोटदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ येणे आणि प्रचंड अशक्तपणा ही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे फिजिशियन डॉ. करण ठक्कर म्हणाले, "पावसाळ्यानंतरचा काळ संसर्गजन्य आजारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेक रुग्ण सुरुवातीला डेंग्यू किंवा मलेरियाला साधा व्हायरल ताप समजून उपचार घेण्यास उशीर करतात. त्यामुळे वेळेत तपासणी, योग्य उपचार आणि शरीरात पुरेसे पाणी राखणे आवश्यक आहे. तसेच साचलेले पाणी हटवणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, शुद्ध पाणी पिणे आणि डासांपासून संरक्षण करणे यामुळे या हंगामी आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो."
फक्त उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्या.
उघड्यावर मिळणारे किंवा अस्वच्छ ठिकाणचे अन्न खाणे टाळा.
वारंवार साबणाने हात धुवा.
पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवा.
पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा.
सकाळी आणि संध्याकाळी डासांचा प्रादुर्भाव जास्त असल्याने मॉस्किटो रिपेलंट वापरा.
घर आणि परिसरात आठवड्यातून एकदा साचलेले पाणी आहे का याची तपासणी करून ते त्वरित हटवा.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, येत्या काही आठवड्यांत हंगामी आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे दिसताच तातडीने पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय हेच पावसाळ्यानंतरच्या आजारांपासून बचावाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा
